कळंब व राळेगाव तालुक्यातील माकपाच्या कार्यकर्त्यांची मेटिखेडा येथे बैठक
जमिनीचे पट्टे मिळवून देतो म्हणून पैसे उकळणाऱ्या भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन
__________________
मेटीखेडा : कळंब व राळेगाव तालुक्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभा ची संयुक्त बैठक दिनांक २३ ला मेटीखेडा येथील श्यामदादा कोलाम चावडीत कॉ. सदाशिव आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी व महाराष्ट्र राज्य किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. चंद्रशेखर सिडाम हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
या बैठकीत राजकीय व संघटनात्मक विषयावर चर्चा करण्यात आली. सर्वप्रथम कॉ. शंकरराव दानव यांचे प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
देश स्वातंत्र्य झाल्यानंतर वनात राहणाऱ्या अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक भूमिहीन नागरिकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी भूमी सुधार कायदा करून जमीन देण्याचे ठरविले. परंतु भूमी सुधार झालाच नसल्याने आदिवासी व अन्य वनात राहणाऱ्या इतर पारंपरिक लोकांनी वन जमीन, रेव्हेन्यू जमीन, देवस्थान जमीन आदी जमिनीवर उदरनिर्वाहासाठी अतिक्रमण करून शासनाच्या कुठल्याही मदतीविना शेती वाहून देशाच्या अन्न उत्पादनात महत्त्वाचा वाटा उचलत आहेत. त्यामुळे मोठ्या कष्टात ते शेती करून उपजीविका चालवीत आहेत. परिणामी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने व अखिल भारतीय किसान सभा देशभरातील ह्या भूमिहीन अतिक्रमित शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे मिळावे म्हणून आंदोलन करीत आहेत. सन २००४ साली डाव्या आघाडीचे ६१ खासदार निवडून आले होते. त्यावेळेस कम्युनिस्ट पक्षाचा रेट्याने वनाधिकार कायदा २००६ करण्यात येऊन अंमलात आणला. ह्या कायद्यानुसार प्रत्येक वन जमीन कसनाऱ्यांना जमिनीचे पट्टे मिळावे म्हणून कम्युनिस्ट पक्ष सातत्याने संघर्ष करीत आहे. पुरावे गोळा करताना आदिवासी बांधवांना अडचण येते म्हणून त्यामध्ये २००८ व २०१२ मध्ये आंदोलनाचे मार्गातून सरकारला कायद्यात बदल करायला लावला. असे असताना आता अनेक भामटे ह्याचा फायदा घेत अतिक्रमण धारकांकडे जाऊन त्यांना जमिनीचे पट्टे मिळवून देतो म्हणून पैसे उकळण्याचे कार्य करीत आहेत. ह्यापासून अतिक्रमण धारकांनी सावध राहून अश्या लोकांना हाकलून लावावे, असे आवाहन या बैठकीतून करण्यात आले आहे.
या बैठकीला कळंब व राळेगाव तालुक्यातील अनेक प्रमुख स्त्री व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.