*लष्करी आळी, तुडतुडा तसेच अन्य पिक नुकसानीची भरपाई तातडीने देण्याचे मुनगंटीवार यांचे निर्देश*

10

*लष्करी आळी, तुडतुडा तसेच अन्य पिक नुकसानीची भरपाई तातडीने देण्याचे मुनगंटीवार यांचे निर्देश*


*पिक विमा भरपाईतील अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनास सूचना*


*धान खरेदीची नोंदणी बंद राहिल्यास संस्थांवर कडक कारवाईचे निर्देश*

*चंद्रपूर, दि. २९ – चंद्रपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी कापणीच्या आधी पिकांवर पडलेल्या लष्करी आळी आणि तुडतुडा सारख्या रोगांमुळे झालेल्या पिक नुकसानीची भरपाई तातडीने देण्याचे निर्देश आज श्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. यासंदर्भात चंद्रपूर जिल्हाधिकारी तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत दूरदृष्यप्रणालीद्वारे (व्हिडियो कॉन्फरन्स) झालेल्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. धान खरेदी केंद्रांवर नोंदणी बंद ठेवून शेतकऱ्यांना नाडणाऱ्या संस्थावर व व्यक्तींवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.*

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागांमधे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. निवडणुक आचारसंहितेपूर्वीच पिक नुकसानीची भरपाई वितरित करण्याचे निर्देश कृषीमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत तत्कालीन कृषीमंत्र्यांनी तेव्हा दिले होते. त्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारींचा आढावाही आज श्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पिक नुकसान भरपाईच्या विविध बिंदूंवर सविस्तर चर्चा झाली. पिक नुकसानीची २०२ कोटी रूपयांची भरपाई या आधीच वितरित करण्यात आलेली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अनेक गावांमधे पिकांवर कापणीपूर्वी लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच अनेक भागात तुडतुडा रोगाचाही प्रादुर्भाव झाला आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे व सर्वेक्षण पूर्ण करून जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित विभागांच्या मदतीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी मदत करावी असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे यासंदर्भातील प्रशासकीय अडचणी त्वरित दूर करण्यात याव्यात, याकरता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून बैठका घेण्याची सूचनाही त्यांनी दिली.

*शेतकऱ्यांना नाडणाऱ्या संस्थांवर कडक कारवाईच्या सूचना*

धान खरेदी केंद्रांवर नोंदणी बंद ठेवून शेतकऱ्यांना नाडणाऱ्या संस्थांवर वेगाने कडक कारवाई करावी अशा सूचनाही श्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी प्रशासनास दिल्या. कुणाच्याही गलथानपणामुळे अथवा राजकारणामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान यापुढे सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलतांना दिला.

दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत चंद्रपूर जिल्हाधिकारी श्री विनय गौडा यांच्यासह कृषी विभागाचे नोडल अधिकारी व अन्य संबंधित विभागांचे अधिकारी आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधीही उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here