बोगस कंपनीकडून युवकांची फसवणूक  :  मनसेकडे तक्रार

4

बोगस कंपनीकडून युवकांची फसवणूक  :  मनसेकडे तक्रार



न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही –:  अमन अंदेवार यांचा इशारा


चंद्रपूर,  :  दि. 01 ऑगस्ट २०२५ रोजीबाबूपेठ येथे सुरू असलेल्या इंडस्ट्री वेंचर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पूरक प्रॉडक्ट विक्रीच्या नावाखाली अनेक युवक-युवतींकडून प्रत्येकी ₹४६,५०० रुपये घेत आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नोकरी आणि कमिशनच्या आमिषाखाली हे पैसे उकळण्यात आले, मात्र गेल्या तीन-चार महिन्यांपासून कोणालाही पगार देण्यात आलेला नाही.
या फसवणुकीमुळे संतप्त झालेल्या पीडित युवक-युवतींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन आंदेवार यांच्याकडे निवेदन देत न्याय मिळवून देण्याची विनंती केली. आंदेवार यांनी त्वरित कंपनी प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्याच दिवशी कंपनीतील सर्व कर्मचारी पसार झाले आणि कार्यालयाला टाळे लावण्यात आले.
त्यानंतर मनसेतर्फे पत्रकार परिषद घेऊन जनतेला या प्रकाराची माहिती देण्यात आली. ही बातमी वाऱ्यासारखी चंद्रपूर जिल्ह्याबाहेरही पोहोचली.
दरम्यान, भद्रावती तालुक्यातील हनुमान आवारी, कृतिका किरटकर, वृक्षाला पोयाम आदी युवक-युवतींनी आंदेवार यांच्याशी संपर्क साधून सांगितले की, वर्धा येथील इंटरनेशिया इंडिया मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनेही असाच फसवणुकीचा प्रकार केला आहे. वर्धा जिल्ह्यातील अनेक युवक-युवतींनीही फसवणूक झाल्याची कबुली दिली.
त्यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष अमन आंदेवार आणि वर्धाचे मनसे जिल्हाध्यक्ष शंकरभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली पीडित व त्यांच्या पालकांसह वर्धा येथील कंपनीच्या कार्यालयात भेट देण्यात आली. मात्र, कंपनीने कोणतेही अधिकृत कागदपत्र दाखवले नाहीत व उडवाउडवीची उत्तरे दिली. चर्चेदरम्यान वाद उफाळून हाणामारी झाली. यानंतर वर्धा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देण्यात आले.
पोलिसांनी उलट मनसे कार्यकर्त्यांवरच हाणामारीप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. या संदर्भात अमन आंदेवार यांनी स्पष्ट केले की, आम्हाला वाटले होते कंपनीसोबत चर्चा करून वाद मिटवता येईल. आमचा उद्देश शांततेने न्याय मिळवण्याचा होता, मात्र परिस्थिती बिघडली याची आम्ही जबाबदारी घेतो.
या संपूर्ण प्रकरणात विशेष बाब म्हणजे, फसवणूक झालेल्या अनेक युवक-युवती हे ग्रामीण भागातील आणि काही अल्पवयीन असल्याने प्रकरण अधिक गंभीर आहे.
मनसेने ठामपणे इशारा दिला आहे की, बाहेरच्या राज्यातील कंपन्या महाराष्ट्रात येऊन युवकांची लूट करणार असतील, तर मनसे स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल. हे आंदोलन केवळ न्यायासाठी असेल आणि तो मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही!
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चंद्रपूर जिल्हा
(कामगार सेना विभाग)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here