गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन: जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते ६१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व लॅपटॉपचे वितरण
घुगुस: ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशनने एक अभिनव व कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. विनय गौडा (भा. प्र. से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत फाऊंडेशनच्या महत्त्वाकांक्षी ‘LLOYDS CLG Grant’ या शिष्यवृत्ती उपक्रमांतर्गत एकूण ६१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच २५ विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण करण्यात आले. हा प्रेरणादायी सोहळा जी.डी. गोएंका लॉयड्स पब्लिक स्कूल, म्हातारदेवी येथे २३ सप्टेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “हा उपक्रम केवळ आर्थिक मदत देण्यापुरता मर्यादित नाही, तर शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा हा एक उत्कृष्ट प्रयत्न आहे. लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशनने घेतलेल्या या पुढाकारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नवी आशा, संधी आणि प्रगतीची दिशा निर्माण होईल. मला खात्री आहे की हे विद्यार्थी भविष्यात शिक्षणाच्या बळावर मोठे यश संपादन करून समाजाला दिशा देतील.” तसेच शिक्षण विभागामार्फत महाविद्यालयां पर्यंत या योजनेची माहिती पोहोचवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ कसा घेता येईल, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देतो. त्यांच्या या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांमध्ये चैतन्य निर्माण झाले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना सकारात्मकतेचा मंत्रया कार्यक्रमाच्या माध्यमातून केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकूण १४७ विद्यार्थ्यांची या योजनेसाठी निवड करण्यात आली असून, हा त्याचा पहिला टप्पा होता. या टप्प्यात निवड झालेल्या ६१ विद्यार्थ्यांपैकी ५ विद्यार्थी जिल्हास्तरीय, तर ५६ विद्यार्थी गावस्तरीय होते.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध होत आहेत, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणातील आर्थिक व तांत्रिक अडचणी दूर होण्यास मदत होईल. कार्यक्रमादरम्यान, जिल्हास्तरीय ५ विद्यार्थ्यांना यापूर्वीच लॅपटॉप देण्यात आले होते, त्यांना यावेळी अनुदानाचे धनादेश प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे, गावस्तरीय २५ विद्यार्थ्यांची लॅपटॉपसाठी निवड करण्यात आली असून, त्यांना लॅपटॉपसोबत अनुदानाचे धनादेशही प्रदान करण्यात आले. याव्यतिरिक्त, सर्व ६१ विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक सहाय्याचे धनादेश देण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार विजय पवार, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे युनिट हेड वाय. जी. प्रसाद, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत पुरी, उपाध्यक्ष पवन मेश्राम आणि शाळेच्या मुख्याध्यापिका जेस्सी रॉय व्यासपीठावर उपस्थित होत्या.
प्रास्ताविक करताना वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत पुरी यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, “लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशनचा उद्देश केवळ आर्थिक मदत करणे नसून, ग्रामीण व वंचित भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे हा आहे. लॅपटॉप आणि आर्थिक सहाय्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन यश संपादन करतील.”
या कार्यक्रमाचे संचालन सहायक महाप्रबंधक विद्या पाल यांनी केले, तर आभार उपव्यवस्थापक श्री दीपक साळवे यांनी मानले. या सोहळ्याला विद्यार्थी, त्यांचे पालक, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, स्थानिक अधिकारी व सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील आनंद, पालकांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि सभागृहात दरवळणारा टाळ्यांचा गजर यामुळे संपूर्ण वातावरण भारून गेले होते.
एकूणच, हा कार्यक्रम केवळ अनुदान वितरणापुरता मर्यादित न राहता शिक्षण, युवा सक्षमीकरण आणि सामुदायिक सहभागाचा एक प्रेरणादायी संगम ठरला. लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशनचा हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.










