*कार्यकर्ता हाच भाजपचा आत्मा : ना.मुनगंटीवार*
*सहाही विधानसभा मतदारसंघात विजयाचा निर्धार*
*चंद्रपुरातील भाजपच्या महाअधिवशेनात फुंकले रणशिंग*
*चंद्रपूर, ता. ४ : तळागाळातील कार्यकर्ता हाच भाजपचा आत्मा आहे. कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातूनच भाजपने गल्लीपासून दिल्लीपर्यंत मजल मारली आहे. लोकसभा निवडणुकीत जे झाले त्याने आम्ही हिंमत हरलेलो नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जोमाने काम करून चंद्रपुरातील सहाही विधानसभा मतदारसंघावर विजयी पताका फडकवावी, असे आवाहन वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.*
चंद्रपूर येथील स्व. ऍड.दादाजी देशकर सभागृहात महाअधिवेशन पार पडले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार अतुल देशकर, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, ज्येष्ठ नेते विजय राऊत, प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, वरोरा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले यासोबतच भाजपा महिला प्रदेश सरचिटणीस, प्रदेश सदस्य, जिल्हा ग्रामीण महामंत्री, पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.
ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने विशेषत: काँग्रेसने लोकांमध्ये असत्य पसरविले. लोकांची दिशाभूल केली. आता भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने लोकांच्या घरापर्यंत पोहचून सत्य पोहोचवावे. कोणताही पक्ष केवळ कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर मोठा होतो. भाजपही कार्यकर्त्यांची काळजी घेणारा पक्ष आहे. पक्षातील कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. पक्षाचे कार्य करताना कार्यकर्त्यांना कौटुंबीक आदी काही समस्या असतील तर त्या सोडविण्यासाठीही मदत करण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न केला जाईल.’
एकापाठोपाठ महायुती सरकारने वेगवेगळ्या जनहिताच्या योजना आणल्या आहेत. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यास या योजना बंद करण्याची घोषणा केली आहे. आपल्या चेलेचपाट्यांना योजनांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करायला लावल्या जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सत्ता मिळविण्याच्या नादात सामान्यांचे नुकसान करीत असल्याचे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. कोणी कितीही प्रयत्न केले तरी महायुती सरकारने सुरू केलेल्या योजना बंद पडणार नाहीत, असेही ते म्हणाले.
भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत आज जिल्हास्तरावर संवाद सुरू आहे. लवकरच तालुकास्तरावरील कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. कार्यकर्त्यांच्या मनातील भावना जाणून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पक्षाचे हित साधणाऱ्या सर्वच सूचनांचे स्वागत करण्यात येईल. या सूचनांच्या आधारावर जिल्ह्यातील भाजपला पुढील वाटचाल करण्यास नक्कीच मदत होईल, असेही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले.
*महाविकास आघाडी सुडाने पेटली आहे*
मुनगंटीवार म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार येण्याची सुतराम शक्यता नाही. पण आलेच तर महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा फेसबूक लाइव्ह मुख्यमंत्री येतील. महाविकास आघाडीमध्ये सगळेच मंत्री एकच विभाग मागतील. हा विभाग असेल जेल विभाग. हे सगळे लोक याला जेलमध्ये टाक, त्याला जेलमध्ये टाक या सुडाने पेटलेले आहे. त्यामुळे जेल हा एकच विभाग महाविकास आघाडीमध्ये काम करणारा असेल, असा टोला ना. श्री. मुनगंटीवार यांनी लगावला.
*लोकांपर्यंत सत्य पोहोचवा*
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना येताच विरोधकांना सरकारच्या तिजोरीची चिंता वाटत आहे. जनतेचा पैसा जनतेलाच देण्याचे काम महायुती सरकार करीत आहे. औरंगजेबाची बाजू घेणाऱ्या विरोधकांच्या पोटात दुखत आहे. सत्तेमध्ये येण्यासाठी काँग्रेस धडपड करीत आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी लोकांशी खोटे बोलण्याचे पाप केले. महायुतीच्या सरकारने, केंद्रातील नरेंद्रजी मोदी सरकारने लोककल्याणाच्या अनेक योजना आणल्या. या योजनांबद्दलही काँग्रेस भ्रम पसरवित आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी यासंदर्भातील सत्य लोकांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन त्यांनी केले.