मारेगाव भाकप च्या नेत्या सहित अनेक कार्यकर्त्यांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश
माकपचे नेते कॉ. ऍड.कुमार मोहरमपुरी, कॉ. ऍड. दिलीप परचाके व कॉ. मनोज काळे यांचे नेतृत्वात पक्ष सभासद फार्म भरून प्रवेश
______________________
मारेगाव : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची कामगार, शेतकरी व कष्टकरी वर्गासाठी असलेली विचारसरणी व शिस्त आणि अनुशासित संघटन बांधणी आणि जिल्ह्यात झालेल्या कॉ. शंकरराव दानव यांच्या जडणघडणीत निर्माण झालेला कार्यकर्ता वर्ग त्यांच्या निधनानंतरही तेवढ्याच ताकदीने उभा राहून कष्टकरी वर्गाचा एकमेव साथी म्हणून लाल झेंडा घेऊन संघर्ष करीत वाटचाल करीत आहे. ज्यामुळे भांडवलशाही व्यवस्थेमध्ये जनतेचे हित नाही व जोपर्यंत देशात समाजवादाची प्रस्थापना होत नाही तोपर्यंत जनतेला खरा न्याय मिळू शकत नाही हे जो जाणतो आणि राजकारणाची खरी दिशा समजतो तोच कम्युनिस्ट पक्षातील प्रामाणिकपणाची निष्ठा जोपासत त्यामध्ये सामील होऊन एक निष्ठावंत कार्यकर्ता बनतो. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा देशातील प्रामाणिक राजकारणाची एक जिवंत ज्वाला असून ते सातत्याने पेटत राहणार आहे. त्यामुळेच जनहिताला सर्वोपरी मानून व्यक्तिगत हिताला दुय्यम मानत माकपच्या चळवळीत सहभागी होतो. हाच धागा पकडून मारेगाव येथील नेते व कार्यकर्ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात सहभागी झाले आहेत.
मारेगाव येथील भाकपचे नेते श्रीकांत तांबेकर व पुंडलिक ढुमने यांचे सोबत अनेक कार्यकर्त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ऍड. कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे राज्य कमिटी सभासद कॉ. ऍड. दिलीप परचाके व जिल्हा उपाध्यक्ष कॉ. मनोज काळे यांचे नेतृत्वात पक्षाचा सभासद फार्म भरून सदस्यत्व स्वीकारले. यावेळेस माकपचे मारेगाव तालुका नेते कॉ. रामभाऊ जिड्डेवार, कॉ. नंदू बोबडे उपस्थित होते.
यावेळेस कॉ. ऍड. कुमार मोहरमपुरी, कॉ. ऍड. दिलीप परचाके व कॉ. मनोज काळे यांनी माकप च्या ध्येय धोरणाची, विचारसरणीची व सध्या देशातील राजकीय परिस्थितीची माहिती देण्यात आली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात सभासद फार्म भरून सामील होणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने पुंडलिक ढुमने, श्रीकांत तांबेकर, धनंजय भोयर, बहिनाबाई चौधरी, प्रफुल आदे, नानाजी घोटेकर, सुरेश भोयर, वासुदेव रोडे आदी व अन्य जणांच्या समावेश आहे.