खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहनांची नुकसान भरपाई कंत्राटदाराने द्यावी – प्रवीण चिमुरकर
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत केली मागणी
भद्रावती, दि.१८ : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, चंद्रपूर ची मासिक बैठक दि. १३ ऑगस्ट ला जिल्हा पुरवठा विभाग येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, शासकिय सदस्य आणि अशासकीय सदस्य उपस्थित होते.
बैठकीत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य प्रवीण रामचंद्र चिमुरकर यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जीवीत हानी तसेच वाहनांचे होणारे नुकसान याकडे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे लक्ष केंद्रीत केले. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जसे वाहन चालक आणि वाहन मालकांकडून वाहनाचे कागदपत्रे, हेल्मेट नसल्यामुळे, वाहनाच्या वेगामुळे, पार्किंग, ड्रंक ॲंड ड्राईव्ह, ट्राफिक सिग्नल मोडल्यास, सीटबेल्ट न लावल्यास, गाडी चालवताना मोबाईल बोलणे यासाठी शासनाकडून अनेक नियम लावून भरमसाठ दंड वसुल केल्या जातो, तसाच दंड म्हणून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई ही रस्ते कंत्राटदाराकडून, टोल कंत्राटदार यांच्याकडून मिळाली पाहीजे. जेणे करून वाहन मालकांचे आर्थिक नुकसान होणार नाही.
एक वाहन मालक वाहन खरेदी करतांना रोड टॅक्स, इंन्शुरन्स, पीयुसी, टोल टॅक्स तसेच अन्य कर भरतो. इतके कर भरूनही एक चांगल्या रस्त्याची निर्मिती होत नाही. प्रत्येक वर्षी रस्ता दुर्घटनेत अनेक लोकांचे जीव जातात, वाहनांचे अतोनात नुकसान होते. यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण कमी नाही. परंतु शासनाचे कंत्राटदारावर कोणतेही अंकुश नसल्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांची डागडुजी वेळेत केली जात नाही. त्यामुळेच अनेक अपघात होतात. त्यामुळेच कंत्राटदारांकडून चांगले रस्ते निर्माण करायचे असल्यास त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहीजे आणि म्हणूनच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहनांची नुकसान भरपाई ही कंत्राटदार यांच्याकडून वसूल करावी अशी रास्त मागणी जिल्हा संरक्षण परिषदेत प्रवीण रामचंद्र चिमुरकर यांनी केली.