- *ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूरच्या ऑटोचालकांसाठी आकर्षक स्थानक!*
*ऑटोचालकांच्या समाधानासाठी सदैव तत्पर : ना. श्री. सुधीर मुनगंटीवार*
*ऑटोरिक्षाचालकांनी मानले ना. मुनगंटीवार यांचे आभार*
*चंद्रपूर, १३ : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरच्या ऑटोरिक्षाचालकांसाठी अत्यंत आकर्षक असा ऑटोस्टँड (स्थानक) साकारला आहे. या स्थानकाचे लोकार्पण ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीने पुढाकार घेऊन ऑटोरिक्षाचालकांसाठी अशाप्रकारची सोय करून देणे, ही दुर्मिळ बाब असल्याची भावना ऑटोरिक्षाचालकांमधून व्यक्त होत आहे.*
‘नवरात्रीच्या शुभपर्वावर शहरातील ऑटो रिक्षाचालकांच्या चेहऱ्यावर आनंद बघताना आंतरिक समाधान लाभत आहे. अत्यंत कष्टाने आयुष्य जगणाऱ्या या ऑटोचालक बांधवांसाठी, त्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मला काही करता आले याचा अभिमान आहे,’ असे भावनिक प्रतिपादन राज्याचे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
चंद्रपूर बस स्थानकाशेजारी अतिशय उत्तम दर्जाचे ऑटोस्टॅंड महानगरपालिकेच्या माध्यमातून पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी करून घेतले. लोकार्पण सोहळ्याला जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा, मनपा आयुक्त श्री. विपीन पालीवाल, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, प्रकाश धारणे,अनिल डोंगरे, नामदेव डाहुले, राजेंद्र खांडेकर, मधुकर राऊत, विनोद चन्ने, सुनील धंदरे यांच्यासह ऑटो रिक्षा युनियनचे पदाधिकारी व ऑटो रिक्षाचालक उपस्थित होते.
ना. मुनगंटीवार म्हणाले, ‘ऑटो रिक्षाचालक हा समाजाचा प्रमुख घटक आहे. त्यांना सन्मानाने व समाधानाने जीवन जगता यावे यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मला जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करीत आलो आहे. ऑटो रिक्षा चालकांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य लाभावे ही माझी मनोमन इच्छा आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना व्यवस्थित घर मिळावे याचाही मी पाठपुरावा करीत आहे.’