“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राज्य समाजवाद” विषयावर प्रबोधन
_________________
राजूर कॉलरी : भारतातील जातीवाद व धर्मांधवादाने देशातील संतांना आणि महापुरुषांना जातीमध्ये व धर्मामध्ये विभागून टाकण्याचे महापाप केले आहे. परिणामी संत व महापुरुषांच्या जयंत्या ह्या त्यांचे विचार अंगिकारून कृती करण्याऐवजी निव्वळ धूमधडाक्यात डीजे लावून नाचगाणे करून आम्ही त्यांना किती डोक्यावर घेतले आहे हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महापुरुषांचे विचार जनमानसात रुजण्याऐवजी व्यवस्था पुरोगामी न होता प्रतिगामित्वाकडे वळत आहे. व्यक्ती तर्कशील, विवेकवादी होण्यापेक्षा अंधभक्त बनत चालला आहे.
शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला हे सर्व आज भयंकर परिस्थितीत आपल्या प्रश्नांना घेऊन जगत आहेत. असे असताना मात्र आपल्या देशातील जनता महापुरुषांच्या योग्य प्रबोधनाअभावी एकजूट होऊन आपल्या मानवी हक्काचा मूलभूत अधिकारासाठी संघर्ष करताना दिसत नाही. हाच धागा पकडून येथील राजूर विकास संघर्ष समितीने संत व महापुरुषांनी दिलेले विचार, त्यांनी विचारासोबत केलेली कृती ह्याचे प्रबोधन करण्याचा निर्धार केला आहे. सध्याचा घडीला उद्भवणारे प्रश्न ह्यांना जोडून काय केल्याने देशाचा विकास योग्य दिशेने होईल हा सुद्धा ह्या प्रबोधन कार्यशाळेचा उद्देश आहे. त्याकरिता सातत्याने ह्या प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन केल्या जाणार असून वेगवेगळ्या विषयातील पारंगत बुद्धिजीवींना पाचारण करून त्यांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.
दिनांक २६ एप्रिल २०२५ रोज शनिवारला सायंकाळी ६ वाजता राजूर येथील महिला मंडळ हॉल येथे “डॉ. बाबासाहेबांचा राज्य समाजवाद” ह्या विषयावर अ. भा. संविधानिक हक्क परिषदेचे अध्यक्ष मा. गीत घोष यांचे मार्गदर्शन होणार आहे.
या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी माजी पंस सदस्य मा. अशोक वानखेडे तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंच मा. विद्याताई डेव्हिड पेरकावार, माजी सरपंच मा. प्रणिता मो. असलम, पो. पा. वामन बल्की, महादेव तेडेवार, दीक्षाभूमी बुद्धविहारचे सचिव ॲड. जितकुमार चालखुरे, आदिवासी युवा जनजागृती संघटनेचे ॲड. अरविंद सिडाम, मारोती पाटील बल्की, अनिल डवरे,दिनेश बलकी उपस्थित राहणार आहे.
या प्रबोधन कार्यशाळेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजूर विकास संघर्ष समितीचे कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, महेश लिपटे गुरुजी, जयंत कोयरे, राहुल कुंभारे, अमित करमणकर, नंदकिशोर लोहकरे, बंडू ठमके, विजय तोताडे व अन्य सदस्यांनी केले आहे.