मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मेंढोली येथे दि. २८ पासून आमरण उपोषण
पारधी समाजाचे विविध मागण्यांना घेऊन होते आहे आंदोलन
आदिवासी विकास मंत्री मा.ना. अशोक उईकेंकडे मागणी
_________________
वणी : येथून १५ किमी अंतरावर असलेल्या मेंढोली गावातील स्मशानभूमी शेजारी झोपड्या बांधून गेल्या २० वर्षापासून पारधी समाजाचे लोक वस्ती करून राहत आहेत. येथे राहणाऱ्या पारधी समाजाला अजूनही नागरी सुविधा उपलब्ध करून न दिल्याने येथील पारधी समाज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्वात दि. २८ एप्रिल पासून मेंढोली येथे आमरण उपोषणाला सुरुवात करीत आहेत.
वणी : तालुक्यातील मौजा मेंढोली येथील गावठाण खरवडी गट नं. ३६ मध्ये अर्जदार प्रकाश घोसले व त्यांचे समवेत २३ पारधी कुटुंबे झोपड्या बांधून राहत आहेत. ह्या २४ पारधी कुटुंबांनी त्यांची घरे नियमानुकुल करून गाव नमुना ८- अ देऊन घरकुलाचा लाभ देण्यात यावा, प्रत्येक कुटुंबाला रेशन कार्ड देण्यात यावे, रेशनकार्ड अती महत्वाचे कागदपत्र असल्याने पारधी समाजातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी जात प्रमाणपत्र व अन्य शालेय दाखल्यासाठी आणि कार्यासाठी आवश्यक आहे. ह्या मागण्या संदर्भात ह्यांनी अनेकदा संबंधित विभागाकडे निवेदने, अर्ज, देऊन सातत्याने पाठपुरावा केला असतानाही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. पण त्याच वेळेस गावात नियमबाह्य पद्धतीने भोगवटदार २ च्या जागेवर नमुना ८ अ देण्यात आल्याचा पुरावा असल्याचे सांगण्यात येत आहे.
शासन निर्णयानुसार निवासी प्रयोजनार्थ उपलब्ध जागेवर जागा देण्यात यावे अशी तरतूद असताना मेंढोली ग्रामपंचायत पारधी समाजाला जागा देण्यास का टाळाटाळ करीत आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. आदिवासी मंत्री अशोक उईके यांना निवेदन देऊन ताबडतोब मागण्या पूर्ण करण्यात याव्या अन्यथा दिनांक २८ एप्रिल पासून आमरण उपोषण करण्यात येईल असे सांगितले असून मेंढोली येथील पारधी कुटुंबांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्वात ह्या आमरण उपोषणाला सुरुवात करीत आहे. जोपर्यंत पारधी समाजाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार प्रकाश घोसले, मालाबाई घोसले, विशाल घोसले, अनिशा घोसले, शुभम घोसले, विठ्ठल घोसले, राजमल घोसले आदी व अन्य लोकांनी केले आहे.