शोषणविरहित समाजव्यवस्थेसाठी बाबासाहेबांच्या राज्य समाजवाद” – गीत घोष
राजूर विकास संघर्ष समितीच्या वतीने राजूर येथे घेण्यात आले प्रबोधन कार्यशाळा
__________________
राजूर कॉलरी : राजुर विकास संघर्ष समितीच्या वतीने येथील माता रमाई सभागृहात प्रबोधन कार्यशाळा घेण्यात आली. या प्रबोधन कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून अ. भा. संविधानिक हक्क परिषदेचे अध्यक्ष मा. गीत घोष होते तर अध्यक्षस्थानी माजी पं. स. सदस्य मा. अशोक वानखेडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच विद्याताई डेव्हिड पेरकावार, पो. पा. वामन बलकी, मारोती पाटील बलकी, वणी वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. यशवंत बरडे, ॲड. अरविंद सिडाम हे होते.
“भारतीय समाजव्यवस्था चातुर्वर्ण पद्धतीनुसार जन्माधिष्ठित असल्याने शूद्रांचे जीवन जगण्याचे मानवी हक्क हिरावून घेण्यात आले होते. त्यामुळे शोषण हे ह्या व्यवस्थेचा मुख्य गाभा होता. संधी नाकारलेल्या शोषित लोकांना प्रत्येक ठिकाणी समान संधी मिळाली पाहिजे, राज्याकडून मूलभूत हक्क हिरावून घेतल्या जाऊ नये, ह्यासाठीच बाबासाहेबांनी राज्य समाजवादाची मांडणी करून उत्पादनाची साधने कारखाने, शेती, जड उद्योग, विमा, शिक्षण व आरोग्य हे सर्व राज्याचा म्हणजेच जनतेच्या मालकीची असावीत, असा मूलभूत गाभा असलेल्या पायावर उभे असलेले संविधान अपेक्षित होते.” असे प्रतिपादन प्रबोधन कार्यशाळेचा “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य समाजवाद” ह्याची मांडणी करताना प्रमुख मार्गदर्शक म्हणून गीत घोष यांनी केले.
राज्य आणि समाजवाद ह्याचा परस्पर खुलासेवार मांडणी करताना घोष पुढे म्हणाले की, “राज्य ही संकल्पना मुळात ही राज्य करण्यासाठी निर्माण झालेली आहे. त्यामुळे कोणत्याही विचाराचा सत्ताधारी राज्यात कार्यरत झाला तरीही त्यांच्याकडून देशातील नागरिकांसोबत कसा व्यवहार केल्या जाईल हे सांगता येत नाही, म्हणून बाबासाहेबांनी राज्य समाजवाद ही मांडणी करून संविधानाचा पायाच मुळात समाजवादी असावा असे सांगितले. सत्तेवर कोणत्याही विचाराचे लोक असले तरीही त्यांना समाजवादी व्यवस्था बदलविता येणार नाही अशी व्यवस्था बाबासाहेबांना करायची होती. परंतु तत्कालीन संविधानसभेतील सदस्यांना हे मान्य नव्हते. म्हणून बाबासाहेबांनी संविधान अर्पण करताना इशारा दिला की, आज आम्हाला राजकीय स्वातंत्र्य मिळाले, परंतु सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्याशिवाय वंचित जनता ह्याला इजा पोहोचवतील. आज आपल्या देशात सामाजिक विषमता, धर्मांधता वाढून एक दुसऱ्याचा शत्रू झाला आहे. प्रचंड खाजगीकरणामुळे आर्थिक विषमता वाढली आहे. उत्पादनाची साधने मूठभर भांडवलदारांच्या हातात एकवटली असून ७० टक्के संसाधनावर कब्जा केला आहे. शिक्षण, आरोग्य व रोजगार हे देशाचा विकासाचे महत्त्वाचे घटक आहेत मात्र त्याला खाजगी क्षेत्रावर सोपवून देशातील नागरिकांना ह्यापासून वंचित ठेवण्याचे कार्य केल्या जात आहे. त्याच बरोबर सांप्रदायिकतेचा वापर करून लोकशाहीलाच धोक्यात आणल्या जात आहे. यावर एकच उपाय असून बाबासाहेबांनी सांगितलेला राज्य समाजवाद आणावा लागेल त्यासाठी जनतेनी चळवळ उभारली पाहिजे,” असे आवाहन केले.
यावेळेस या कार्यक्रमात पहलगाम येथील अतिरेक्यांकडून मृत्युमुखी झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याचसोबत MPSC परीक्षेत पास झालेल्या येथील प्रशिक अजय कांबळे ह्याचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात वणी वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. यशवंत बरडे व आदिवासी युवा जनजागृती संघटनेचे ॲड. अरविंद सिडाम यांनीही आपले विचार व्यक्त केले. प्रबोधन कार्यशाळेची प्रस्तावना कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांनी केली तर सूत्र संचालन राष्ट्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महेश लिपटे सर यांनी केले.
प्रबोधन कार्यशाळेला प्रामुख्याने नंदकिशोर लोहकरे, राहुल कुंभारे, जयंत कोयरे, विजय तोताडे, विनायक येसंबरे, सुनील सातपुते, सुनीता कुंभारे, अर्चना कडुकर, नंदकिशोर मुन, कैलास पाईकराव, अमर्त्य मोहरमपुरी, पीयूष कांबळे, सौरभ पाईकराव, सौरभ मजगवळी, वैभव मजगवळी, नाना लोहकरे, आदी व अनेक गावकरी उपस्थित होते.