महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त राजूर येथे प्रबोधन कार्यशाळा
कामगारांचे श्रम व त्यांच्या श्रमाची चोरी” ह्या विषयावर अरुण भेलके यांचे होणार मार्गदर्शन
प्रबोधनाला उपस्थित राहण्याचे राजूर विकास संघर्ष समितीचे जनतेला आवाहन _______________________
राजुर कॉलरी : १ मे हा दिवस संपूर्ण जगात कामगार दिन म्हणून साजरा केला जातो, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. हे दोन्ही दिवस साजरा करीत असताना ह्या मागील काय इतिहास आहे आणि ह्या मागे कोणाचे योगदान आहे तसेच ज्या कामगारांच्या बलिदानातून ह्या दिवसांचे महत्व आहे त्याच कामगारांची आज काय अवस्था आहे हे समजविण्यासाठी व कामगारांच्या उत्थाना साठी काय उपाय आहेत ह्यावर सविस्तर मार्गदर्शन, राजुर विकास संघर्ष समितीचे वतीने प्रबोधन कार्यशाळेचा माध्यमातून राजूर येथे करण्यात आले आहे. ह्या प्रबोधन कार्यशाळेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घेण्यासाठी समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
येथील राजूर विकास संघर्ष समितीने नागरिकांच्या जीवनात निर्माण होणारे विविध प्रश्न, समस्या, त्यावर असलेले उपाय ह्याचे सांगोपांग विवेचन करणारे प्रबोधन व्हावे व त्यावर कृती व्हावी ह्या उद्देशाने सातत्याने प्रबोधन कार्यशाळा घेण्याचे ठरविले आहे. त्याच अनुषंगाने शनिवार, दिनांक ३ मे २०२५ ला सायंकाळी ६ वाजता रमाई सभागृहात जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कामगारांचे प्रश्नावर कामगार व शेतकरी चळवळीत काम करणारे अरुण भेलके यांचे प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रबोधन कार्यशाळेचा अध्यक्षस्थानी येथील सामाजिक कार्यकर्त्या व आशा वर्कर सुनीता राहुल कुंभारे ह्या राहणार आहेत.
ह्या प्रबोधन कार्यशाळेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजूर विकास संघर्ष समितीचे कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, महेश लिपटेसर, जयंत कोयरेसर, राहुल कुंभारे, नंदकिशोर लोहकरे, विजय तोताडे, सुनील सातपुते, बंडू ठमके आदींनी केली आहे.