घुग्घुस मध्ये लॉयड्स इंफिनाईट फाउंडेशन आणि जी. डी. गोयंका लॉयड्स पब्लिक स्कूलचा यशस्वी समर कॅम्प

26

घुग्घुस मध्ये लॉयड्स इंफिनाईट फाउंडेशन आणि जी. डी. गोयंका लॉयड्स पब्लिक स्कूलचा यशस्वी समर कॅम्प



घुग्गुस, दि. २८: लॉयड्स इंफिनाईट फाउंडेशन आणि जी. डी. गोयंका लॉयड्स पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शनी कन्या विद्यालय, घुग्गुस येथे आयोजित पाच दिवसीय समर कॅम्प आज उत्साहात संपन्न झाला. २४ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत झालेल्या या समर कॅम्पमध्ये १० ते १४ वयोगटातील सुमारे 374 मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या समर कॅम्पच्या समारोपीय कार्यक्रमाला लॉयड्स मेटल्सचे युनिट प्रमुख श्री. वाय. जी. एस. प्रसाद, लॉयड्स मेटल्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. प्रशांत पुरी आणि प्रियदर्शनी कन्या विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती अनु खानझोडे, उपव्यवस्थापक श्री. दीपक साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
समर कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना वैदिक गणिताचे मार्गदर्शन श्री. डॉ. अविनाश चल्लेलवार यांनी, भक्ती संगीताचे मार्गदर्शन श्री. उमाकांत खेडीकर यांनी, जीवन कौशल्ये राखी बुराडे यांनी, स्पोकन इंग्लिश साहेर सरोदे यांनी आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे मार्गदर्शन स्वाती घारोटे यांनी केले. या तज्ज्ञ शिक्षकांनी मनोरंजक पद्धतीने मार्गदर्शन केल्यामुळे मुलांनी वैदिक गणित, जीवन कौशल्ये, भक्ती संगीत, स्पोकन इंग्लिश आणि व्यक्तिमत्त्व विकास यांसारख्या विविध विषयांचे ज्ञान आनंदाने प्राप्त केले.
समर कॅम्पच्या अंतिम दिवशी मुलांनी शिकलेल्या विविध कला आणि ज्ञानाचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांनी वैदिक गणितातील ट्रिक्स, आत्मविश्वासाने संवाद साधण्याची कला आणि मधुर भक्तीगीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आपल्या मुलांमधील आत्मविश्वास आणि झालेली प्रगती पाहून पालक अत्यंत आनंदित झाले होते.
यावेळी लॉयड्स मेटल्सचे युनिट प्रमुख श्री. वाय. जी. एस. प्रसाद म्हणाले, “मुलांना त्यांच्या सुट्ट्यांमध्ये उपयुक्त आणि आनंददायी शिक्षण मिळावे हा या समर कॅम्पचा मुख्य उद्देश होता. मुलांचा उत्साह आणि त्यांनी केलेली प्रगती पाहून आमचा उद्देश सफल झाला आहे. समर कॅम्पमध्ये जे शिकवले आहे त्याचा प्रत्यक्ष जीवनात वापर करूनच पारंगत होणार, त्यामुळे सतत प्रयत्न करीत विकास साधावा.”
लॉयड्स मेटल्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. प्रशांत पुरी यांनी प्रियदर्शनी कन्या विद्यालयाच्या सहकार्याबद्दल आणि शिक्षकांच्या समर्पित वृत्तीबद्दल आभार व्यक्त केले. ते म्हणाले, “अशा प्रकारचे उपक्रम मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि भविष्यातही आम्ही असे उपक्रम आयोजित करत राहू.”
प्रियदर्शनी कन्या विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती अनु खानझोडे यांनी समर कॅम्पच्या यशस्वी आयोजनाबद्दल लॉयड्स इंफिनाईट फाउंडेशन आणि जी. डी. गोयंका लॉयड्स पब्लिक स्कूलचे अभिनंदन केले. सदर कॅम्पसाठी कोणतेही शुल्क नव्हते, त्यामुळे सामान्य कुटुंबातील मुलांसाठी हा कॅम्प फायदेशीर ठरला. तसेच, मुलांची नाश्ता आणि गिफ्टची व्यवस्था अतिशय योग्य होती, असेही त्या म्हणाल्या. तसेच, त्यांनी सहभागी झालेल्या मुलांचे कौतुक केले.
एकंदरीत, हा समर कॅम्प मुलांसाठी एक अविस्मरणीय, आनंददायी आणि ज्ञानवर्धक अनुभव ठरला, ज्यामध्ये त्यांनी केवळ शिक्षणच घेतले नाही, तर नवीन मित्रही जोडले.
या कार्यक्रमाचे प्रभावी संचालन श्री. अनुराग मत्ते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी समारोपानंतर आभार प्रदर्शन स्नेहा रणदिवे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. श्रीरंग पोतराजे, सौ. शीतल कौरासे आणि लॉयड्स इंफिनाईट फाउंडेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here