“कुणी सांगितले म्हणून नाही तर स्वतः प्रेरित व्हा” – प्रा. वैभव ठाकरे
राजूर विकास संघर्ष समितीची प्रबोधन कार्यशाळा संपन्न
______________________
राजूर कॉलरी : ” शासकीय नोकऱ्यांची कमी भरतीमुळे मोठ्या प्रमाणावर स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे नोकरी मिळण्याचे प्रमाण एक टक्के सुद्धा नसल्याने स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी संपूर्णपणे झोकून देण्याची गरज असते. तेव्हा ह्या प्रक्रियेत उतरत असताना कुणीतरी सांगतो किंवा सर्वच करतात किंवा घरच्यांचा आग्रह आहे म्हणून किंवा शिक्षक सांगतात म्हणून नाही तर आपल्या घरची परिस्थिती पासून प्रेरणा घेऊन स्वतः प्रेरित व्हा आणि ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करा, तरच यश मिळण्याची गॅरंटी असते.” असे आवाहन येथे राजूर विकास संघर्ष समितीने आयोजित केलेल्या “ध्येय कसे निवडायचे व ते कसे गाठायचे” ह्या विषयावर मार्गदर्शन करताना प्रबोधन कार्यशाळेत प्रा. वैभव ठाकरे यांनीकेले.
राजूर कॉलरी येथील रमाई सभागृहात राजूर विकास संघर्ष समितीच्या वतीने गेल्या महिनाभरापासून विविध विषयांचे गावकऱ्यांना प्रबोधन करण्याचा दृष्टीने दर शनिवारला प्रबोधन कार्यशाळा घेण्यात येत आहे. याआठवड्याला १० वी, १२ वी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निवडत असताना कोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी अभ्यासाची तयारी कशी करावी, कुठे करावी त्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत ह्या सर्व विषयांची माहिती देण्यासाठी पीएचडी स्कॉलर पल्लवी धम्मप्रिय यांचे अध्यक्षतेखाली प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्राचे प्रा. वैभव ठाकरे व युवा चेतना क्लब चे प्रा. डॉ. दिलीप मालेकर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रश्मी क्लासेस चे संचालक संजय धोबे, शिक्षिका रक्षा अमोल वानखेडे, सामाजिक कार्यकर्त्या सुनीता राहुल कुंभारे उपस्थित होते.
प्रबोधन कार्यशाळेला उपस्थित पालकवर्गांना उद्देशून प्रा. ठाकरे यांनी पुढे बोलताना प्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस एडिशन चे उदाहरण देत सांगितले की, ” थॉमस एडिशन लहानपणी कमी बुद्धीचा असताना त्याच्या शाळेने त्याला शिक्षण देण्याचे नाकारण्यासाठी त्याचा आई साठी पत्र दिले, पण त्याच्या आईने मुलाला पत्राचे मजकूर कळू न देता मुलाचे मनोबल वाढविण्यासाठी, ‘थॉमस खूप हुशार आहे आणि शाळाच असक्षम आहे ‘ असे सांगून त्याला घरीच शिकविले. थॉमसला त्याचा आईने त्याला प्रेरित करून त्याचे मनोबल वाढविल्याने थॉमस एडिशन हा थोर शास्त्रज्ञ बनू शकला. यामुळे मुलांना घडविण्यासाठी घरच्यांनी सुद्धा मुलांचे मनोबल वाढविण्यावर जोर द्यावा.” असे प्रतिपादन केले.
प्रा. डॉ. दिलीप मालेकर यांनी मार्गदर्शन करताना देशात सुरू असलेल्या शिक्षणाचा खाजगीकरणावर खंत व्यक्त करताना सांगितले की, ” आज उच्च शिक्षण हे श्रीमंतांची मक्तेदारी झाली असून गरीबांना शिक्षण घेणे दुरापास्त झाले आहे. तर दुसरीकडे आर्मी मध्ये अग्निवीर योजना आणून देशातील तरुणांच्या भविष्याशी सरकारने खेळणे सुरु केले आहे. खाजगी कंपन्यामध्ये कमी वेतन मिळत असल्याने तथा महागाई प्रचंड वाढली असल्याने प्राथमिक गरजा सुद्धा पूर्ण करणे कठीण झाले आहे. सरकार रोजगार देऊ शकत नसल्याने धर्माचा नावावर द्वेष पसरविण्याचे कार्य करीत आहे. अश्या परिस्थितीत विद्यार्थ्यांसमोर एकच पर्याय उरतो तो म्हणजे स्पर्धा परीक्षा कडे वळणे आणि त्यासाठी जिद्दीने अभ्यास करणे.”
या प्रबोधन कार्यक्रमात १० वी, १२ वीत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे उपस्थित विद्यार्थ्यांनाही पुस्तके वाटप करण्यात आलीत.
या प्रबोधन कार्यशाळेचे प्रास्ताविक कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांनी केले तर संचालन महेश लिपटे सर यांनी तर आभार शिक्षिका रक्षा अमोल वानखेडे यांनी मानले. या प्रबोधन कार्यशाळेला १० वी, १२ वी केलेले विद्यार्थी तसेच पालक सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विजय तोताडे, सुनील सातपुते, पीयूष कांबळे, अमर्त्य मोहरमपूरी, अक्षांत मोहरमपुरी, यांनी परिश्रम घेतले.