महामाया कोल वॉशरीवर पर्यावरणीय व अग्निसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन माजी उपसरपंच स्थानिक नागरिकांकडून तक्रार.
घुग्घुस : चंद्रपूर जिल्ह्यातील मौजा बेलसनी येथील “महामाया कोल वॉशरी” या कोळसा धुलाई प्रकल्पाविरोधात पर्यावरणीय, जलप्रदूषण व अग्निसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात ग्रामपंचायत घुग्घुसचे माजी उपसरपंच श्री. सुधाकर गणपत बांदुरकर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) प्रादेशिक कार्यालयाकडे सविस्तर तक्रार सादर केली आहे.
तक्रारीतील मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे:
पाणीसाठवण व उपचार यंत्रणा: वॉशरीमध्ये कोळसा धुलाईसाठी वापरलेले पाणी साठवण्यासाठी कोणतेही सिमेंट काँक्रीट टँक अथवा सुरक्षित जलाशय नसल्याचा गंभीर आक्षेप. पाण्याचे पुर्नवापरासाठी योग्य उपचार (ट्रीटमेंट युनिट) कार्यरत असल्याचे कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.
पावसाचे पाणी साठवण: पर्यावरण मंत्रालयाच्या अनिवार्य सूचनांनुसार रेनवॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था असावी लागते. मात्र, सदर वॉशरीत अशी कोणतीही प्रणाली कार्यरत नसल्याची माहिती समोर आली आहे.
जलप्रदूषणाचा धोका: वापरलेल्या पाण्याचा निचरा योग्य प्रक्रिया न करता नैसर्गिक नाल्यात किंवा पाण्याच्या स्रोतांमध्ये होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे, ज्यामुळे स्थानिक पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
अग्निसुरक्षा उपाययोजना: कोळसा साठवण व धुलाई प्रक्रियेत आग लागण्याचा धोका मोठा असतो. तरीही वॉशरीत अग्निशामक साधने, फायर अलार्म सिस्टीम व प्रशिक्षित कर्मचारी यांची व्यवस्था अपुरी असल्याचे निदर्शनास आले आहे.
पाण्याच्या वापरावरील प्रश्नचिन्ह: वॉशरीमध्ये वापरले जाणारे पाणी कुठून उचलले जाते, त्यासाठी शासनाची परवानगी आहे का, तसेच किती प्रमाणात पाणी वापरले जाते – याची कोणतीही स्पष्ट माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.
मागण्या व विनंत्या: . बांदुरकर यांनी मागणी केली आहे की:
1. प्रकल्पाकडे पर्यावरणीय मंजुरी, जलवापर परवाने व अग्निसुरक्षा प्रमाणपत्रांची तात्काळ चौकशी करावी. 2. नियमभंग आढळल्यास कडक कारवाई करण्यात यावी. 3. आपत्ती व्यवस्थापन योजना अस्तित्वात व कार्यरत आहे की नाही याची तपासणी व्हावी. 4. आवश्यकता भासल्यास प्रकल्पाला कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) बजावण्यात यावी. 5. प्रकल्पाच्या पर्यावरणीय व सामाजिक परिणामांविषयी स्थानिक नागरिकांना पारदर्शक माहिती दिली जावी