स्माईल फाउंडेशनने घेतले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व
वणी: आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी वणीतील स्माईल फाउंडेशनने मोठी पाऊल उचलले आहे. वणी तालुक्यातील अनाथ, दिव्यांग, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील, पितृछत्र हरवलेल्या आणि गरजू १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम 24 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता स्थानिक विठ्ठल रुक्मिणी सभागृह येथे संपन्न झाला. कार्यक्रमात दिलीप कोरपनेवार यांना आदरांजली वाहण्यात आली.
स्माईल फाउंडेशनने या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले असून, त्यांना शालेय पुस्तके, स्कूल बॅग, एक्झाम बोर्ड, वॉटर बॉटल, पेन, पेन्सील आदी साहित्य वितरित करण्यात आले. पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा या उपक्रमात समावेश आहे. वाटप सोहळ्यास ज्योती नगरवाला, चंद्रकला मुथा, रजिया काठेड, सुरेश बनसोड, बालाजी मिलमिले आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त रमेश बोबडे यांच्या हस्ते पार पडला. या उपक्रमासाठी विविध दानदात्यांनी रोख, वस्तू आणि अन्य स्वरूपात मदत केली.
या प्रसंगी विस्तार अधिकारी रमेश बोबडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, शिक्षणामुळे यशाचे शिखर गाठता येते आणि पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
दानशुरांना मदतीचे आवाहन स्माईल फाउंडेशनचा हा उपक्रम वर्षभर सुरू असतो. वर्षभरात अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून विविध प्रकारची शैक्षणिक मदत केली जाते. या उपक्रमाला वस्तू, रोख किंवा धनादेशाद्वारे मदत करता येते. त्यामुळे अधिकाधिक दात्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. देणगी किंवा वस्तू वॉटर सप्लाय परिसरातील कार्यालयात स्वीकारल्या जातात. यासाठी संस्थेचे अध्यक्ष सागर यांच्याशी 7038204209 वर संपर्क साधता येईल.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव, पीयूष आत्राम, आदर्श दाढे, विश्वास सुंदराणी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, तन्मय कापसे, गौरव कोरडे, दिनेश झट्टे, कुणाल आत्राम, कार्तिक पिदूरकर, सचिन काळे, रोहित ओझा, तुषार वैद्य, युग, सचिन भोयर यांनी परिश्रम घेतले.