पाऊस थांबताच महामार्गांवरील क्षतीग्रस्त भागाच्या दुरुस्तीची कामे हाती घ्यावी

2

पाऊस थांबताच महामार्गांवरील क्षतीग्रस्त भागाच्या दुरुस्तीची कामे हाती घ्यावी



आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मागणी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार


*चंद्रपूर – नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड क्षती झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते फुटलेले आहेत. येत्या काळात त्यामुळे अपघातांचा तीव्र धोका संभवतो. यात जीवित हानी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे पाऊस थांबताच या महामार्गाची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या मागणी संदर्भात ते लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर ते मुल, चंद्रपूर ते नागपूर, चंद्रपूर ते राजुरा – विरूर – लक्कडकोट असे मार्गक्रमण करत तेलंगणा राज्याकडे जाणारा महामार्ग हे राष्ट्रीय महामार्ग सध्या सुरु असलेल्या संततधार पावसाने आणि अतिवृष्टीमुळे क्षतीग्रस्त झाले आहेत. पावसाचा प्रतिकूल परिणाम या महामार्गावर झाला असून बऱ्याच ठिकाणी वाहतूक अवरुद्ध झाल्याचे दिसून येत आहे. पावसा दरम्यान काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. वाहतुक प्रभावित झाली होती, धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. जाम ते बामणी या महामार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचून अपघातांचा धोका संभवतो. पाऊस थांबताच रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. पुल, ओढे, नाले यांची नियमित तपासणी आणि पाणीचाल नियंत्रणासाठी लोकरस्त्रक बांधणे आवश्यक आहे, याकडे आ.. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधलं आहे.
पूरग्रस्त भागातून प्रवास टाळण्याच्या सूचना नागरिकांना देण्याची आवश्यकता आहे. हे सर्व राष्ट्रीय महामार्ग अतिशय तीव्र वाहतूक आणि वर्दळ असणारे असल्यामुळे अपघात होऊ नये या दृष्टीने दुरुस्तीची कामे, निष्काळजी वाहतूक बंदी, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, रस्त्यांची नियमित देखभाल करणे आणि संबंधित उपाययोजना पाऊस संपताच हाती घेण्याची आवश्यकता आहे. पाऊस थांबताच या महामार्गावर दुरुस्तीची कामे त्वरित हाती घेण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here