(तालुका प्रतिनिधी) भद्रावती, दि. ३१ : शहरातील गौतम नगरमध्ये मोकाट जनावरे दिवस रात्र फिरत असून गौतम नगरकर यामुळे त्रस्त झाले आहे. गौतम नगर येथे अनेक शेतकरी वास्तव्यास आहेत. ते शेती सोबत जोडधंदा म्हणून दुधांचा व्यवसाय करतात. मात्र हेच जनावरांचे मालक जनावरांवर कोणतेही लक्ष न देता त्यांना शहरात, वार्डात मोकाट सोडतात. त्यामुळे दिवस आणि रात्र नागरिकांना ह्या मोकाट जनावरांना हाकलत राहावे लागते. शहरातील, वार्डातील लोकांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळेस कोणाला अचानक दवाखान्यात जायचे असल्यास रस्त्यावर बसून असलेल्या जनावरांमुळे रूग्णाला वेळेत दवाखान्यात पोहचवणे शक्य होत नाही. तर कधी अचानक अंगावर धावून आल्यामुळे लोकांचे, शाळकरी मुलांचे अपघात होत आहे. शाळकरी मुले आणि पालकांमध्ये यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नगरपरिषद भद्रावती ने मोकाट जनावर मालंकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि अपघात किंवा मोकाट जनावरांमुळे होणारी नुकसान भरपाई म्हणून जनावर मालकांकडून वसूल करण्यात यावी. असे तीव्र प्रतिसाद नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहे.