आमदार. सुधीर मुनगंटीवार यांचा खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पुढाकार

4

आमदार. सुधीर मुनगंटीवार यांचा खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पुढाकार



तात्काळ रस्ते दुरुस्तीची कार्यवाही करण्याचे प्रशासनाला निर्देश


बल्लारपूर-कोठारी, चंद्रपूर-मुल रस्त्याची आ. मुनगंटीवार यांच्याकडून पाहणी


*चंद्रपूर – सर्वसामान्य नागरिकांना उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी कायम आग्रही असलेले राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार. सुधीर मुनगंटीवार यांनी खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पुढाकार घेतला आहे. तातडीने रस्ते दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहे. यातून जनहिताच्या कामांमधील त्यांची तत्परता पुन्हा एकदा बघायला मिळत आहे.*
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर-बामणी-कोठारी, चंद्रपूर-मुल आणि चंद्रपूर-जाम या प्रमुख मार्गांवरील खड्डे आणि उखडलेले रस्ते, ही गंभीर समस्या बनली आहे. रस्त्यावरील खड्डे म्हणजे थेट मृत्यूचे निमंत्रण ठरत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही स्थिती अत्यंत चिंताजनक असून संबंधित विभागांना तात्काळ रस्ते दुरुस्तीची कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत दिले.
बल्लारपूर-बामणी-कोठारी आणि चंद्रपूर-मुल या दोन्ही रस्त्यांच्या डागडुजी संदर्भात बल्लारपूर येथील शासकीय विश्रामगृहात आ.. मुनगंटीवार यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.
यावेळी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार रेणुका कोकाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अशोक गाडेगोणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, भाजपा नेते रामपाल सिंग, चंदू मारगोनवार, अक्षय पगारे, उपअभियंता संजोग मेंढे, राज्य महामार्ग विभागाचे उपअभियंता श्री. बोबडे, उपविभागीय अभियंता श्री. अंबुले, श्री. चव्हाण, श्री.राठोड, आदींची उपस्थिती होती.
‘रस्त्याच्या डागडुजीसंदर्भात संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी. रस्त्याचे अंदाजपत्रक तयार करून तीन दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात यावी. पावसाचा खंड पडताच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात यावे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. खड्ड्यांमुळे अपघातात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेलेला असून, अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी रस्ते अपघाताच्या बाबतीत कायदा प्रस्थापित करणे आवश्यक आहे. रस्ता उखडलेला असेल किंवा मोठे खड्डे पडले असतील, तर अशा ठिकाणी 100 फुटांपर्यंतचा रस्ता खोदून त्याचे रेडियम पट्ट्यासह संपूर्ण नूतनीकरण करण्यात यावे,’ असे निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिले.
त्यासोबतच बीओटी मार्गांवर खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला, तर अपघातग्रस्त कुटुंबाला 50 लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचेही आ.. मुनगंटीवार म्हणाले. ‘बामणी येथे सर्व्हिस रोड देण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यात यावी. कोठारीकडे जाणारा रस्ता आणि कोठारी पुलाचे काम तात्काळ हाती घेण्यात यावे. सर्व रस्त्यांचा ‘रफनेस इंडेक्स’ तपासून तो निर्धारित मानकांनुसार आहे की नाही, हे निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच, मुल रस्त्यावरील अपघातांने किती मृत्यू झाले आहेत, याबाबतची माहिती पोलीस अधीक्षकांकडून घेण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून बल्लारपूर-कोठारी आणि चंद्रपूर-मुल रस्त्याची पाहणी*
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बल्लारपूर-कोठारी आणि चंद्रपूर-मुल रस्त्याची पाहणी केली तसेच संबंधित विभागाला तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. ज्या दर्जेदार रस्ते तयार होणे अपेक्षित आहे, त्या दर्जाचे काम कंत्राटदारांकडून होताना दिसत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक प्रकल्पासाठी दिला जाणारा ‘डिफेक्ट लायबिलिटी पिरियड’ (DLP) हा पाच वर्षांचा असून, त्या कालावधीत संबंधित रस्त्याचा ‘रफनेस इंडेक्स’ मोटरेबल ठेवणे बंधनकारक आहे. खड्डा लहान असतानाच त्याची तत्काळ दुरुस्ती करावी. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक असून, गरज असल्यास त्यावर कार्पेटिंग करावे. मोठ्या प्रमाणात खड्डे असलेल्या व उखडलेल्या रस्त्यांच्या नूतनीकरणाचे काम कंत्राटदाराकडून तातडीने करून घेण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश आमदार  सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाला यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here