लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनतर्फे आधुनिक निओ ट्रॉली स्प्रे पम्प, व बॅटरी स्प्रे पम्प वितरण कार्यक्रम संपन्न
घुग्घुस :
ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाशी परिचित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशनच्या वतीने एक विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा प्रियदर्शनी कन्या विद्यालय, घुग्घुस येथे पार पडली. या उपक्रमात उसगाव म्हातारदेवी शेणगाव नकोडा पांढरकवडा मुरसा धानोरा पिंपरी अंतुर्ला बेलसणी आणि वढा या आजूबाजूच्या परिसरातील ७० पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला.हा उपक्रम महिला ग्राम संघासाठी प्रेरणादायी ठरला असून, त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याची दिशा त्यातून निश्चित झाली आहे. याच माध्यमातून ग्रामसंघाना एकूण ३० निओ ट्रॉली स्प्रे पम्प, व ६० बॅटरी स्प्रे पम्प वितरित करण्यात आले या स्प्रे पम्प मुळे महिला सुद्धा शेतात फवारणी करू शकणार आणि शाररीक कष्ट कमी होऊन काम जास्त होईल. तसेच गावातील शेतकऱ्यांना निओ ट्रॉली स्प्रे पम्प, व बॅटरी स्प्रे पम्प किरायाने देऊन ग्राम संघाला आर्थिक उत्पन्न वाढवू शकेल
महिला ग्राम संघ हा ग्रामीण विकासाचा कणा आहे. त्यामुळे महिलांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, सरकारी योजना, आणि स्वयंरोजगाराच्या संधींबद्दल माहिती देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा कार्यशाळेचा मुख्य हेतू होता.
आधुनिक शेती प्रशिक्षण:
महिलांना स्प्रे पम्प, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, खत व्यवस्थापन, आणि निओ स्प्रे पम्प यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
सरकारी योजनांची माहिती:
पीक विमा योजना, शेळीपालन, कुक्कुटपालन, तसेच इतर अनुदानित योजना यांची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यामुळे महिलांना सरकारी योजनेचा लाभ घेण्यास मदत होईल.
आर्थिक स्वावलंबन यावर भर:
महिलांना बचतगटांच्या माध्यमातून छोटे व्यवसाय सुरू करता येतात, यासाठी फाउंडेशनतर्फे बाबू प्रशिक्षण, शिवणकाम प्रशिक्षण आणि ब्युटीपार्लर प्रशिक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेला लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या सहायक महाप्रबंधक विद्या पाल यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यांनी महिलांना शेतीतील आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन केले.
उपव्यवस्थापक श्री दीपक साळवे यांनी फाउंडेशनच्या आगामी उपक्रमांची आणि निओ स्प्रे पम्प याचे प्रात्यक्षिक करून दाखवले माहिती दिली आणि भविष्यातही असेच उपक्रम राबविण्यात आश्वासन दिले.
या कार्यशाळेमुळे महिलांना केवळ माहितीच मिळाली नाही, तर एक नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली. त्यांनी शेती क्षेत्रात अधिक सक्रिय आणि प्रभावी भूमिका बजावावी, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनचा हा उपक्रम ग्रामीण महिलांच्या प्रगतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल अशी आशा महिलांनी व्यक्त केली .
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री अनुराग मत्ते, श्री महेश उपरे, श्री श्रीरंग पोतराजे, मानसी खोब्रागडे, सौ. शीतल कौरासे, आणि लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले










