*कौशल्य प्रशिक्षणातून स्थानिक उमेदवारांना रोजगारात प्राधान्य द्या-आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार*

16

*कौशल्य प्रशिक्षणातून स्थानिक उमेदवारांना रोजगारात प्राधान्य द्या-आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार*



*उद्योगविश्वाच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ घडविण्याचे निर्देश*


*चंद्रपूर, दि. 30 : महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेले चंद्रपूर व गडचिरोली हे जिल्हे समृद्ध खनिजसंपत्तीने नटलेले असून, याच संपत्तीच्या बळावर राज्य सरकारमार्फत अनेक उद्योगांना चालना दिली जात आहे. समृद्धी महामार्गाचा विस्तार व पोंभुर्णा एमआयडीसीसारख्या विकासात्मक उपक्रमांमुळे या भागातील उद्योग क्षेत्राला वेग येण्याची अपेक्षा आहे. आगामी काळात स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होणार असून, उद्योगविश्वाच्या गरजेनुसार त्यांना आवश्यक कौशल्य व संसाधनाचे प्रशिक्षण देऊन स्थानिकांना रोजगारात प्राधान्य द्यावे, असे निर्देश राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत दिले.*
चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात नियोजन भवन सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनूले,
कामगार मोर्चाचे प्रदेश महामंत्री अजय दुबे,भाजपा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, सुरज पेदुलवार, प्रज्वलंत कडू, नम्रता ठेमस्कर, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, भविष्यात पारंपारिक (ट्रेडिशनल) कोर्सेसऐवजी उद्योगांना आवश्यक असणाऱ्या तांत्रिक कोर्सेसचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे. रोजगाराच्या दृष्टीने जगभरात प्रचंड संधी उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील युवकांना योग्य प्रशिक्षण दिल्यास ते महाराष्ट्राबाहेर तसेच जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी प्राप्त करू शकतात.जिल्ह्यात असलेल्या विविध कंपन्यांमध्ये स्थानिक उमेदवारांना रोजगाराच्या संधी देताना प्राधान्य देण्यात यावे. जिल्ह्यात आचार्य चाणक्य कौशल्य केंद्रांची पाच केंद्रे कार्यरत आहेत. आयटीआयतून अप्रेंटिससाठी विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात कसे पाठविता येईल याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच प्राचार्य व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करावा. आयटीआयसाठी आवश्यक पायाभूत सुविधा व साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी निधीची तरतूद करता येईल. जिल्ह्यातील 16 आयटीआय उद्योगांनी दत्तक घ्याव्यात. बल्लारपूर पेपर मिलने एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या उपकेंद्रासोबत प्रशिक्षणासाठी करार करावा.
उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी भविष्यातील गरजांचा वेध घेऊन कोणत्या प्रकारचे प्रशिक्षित मनुष्यबळ आवश्यक आहे याचा अंदाज द्यावा. त्यानुसार विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण कोणत्या आधुनिक यंत्रसामग्रीवर व्हावे हे निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच कंपन्यांनी सीएसआर निधीतून काही आवश्यक टूल्स व यंत्रसामग्री खरेदी करून उपलब्ध करून दिल्यास प्रशिक्षणाची गुणवत्ता अधिक प्रभावीपणे वाढविता येईल.
आमदार श्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, इन्स्टिट्यूट राज्यात अव्वल यावी यासाठी प्रत्येक बाबतीत सूक्ष्म माहिती एकत्रित करून आवश्यक नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी आयटीआयमध्ये वॉल कंपाऊंड, भौतिक संसाधने तसेच आधुनिक टूल्स आणि यंत्रसामग्रीची उपलब्धता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. बल्लारपूर आयटीआयला त्रिवेणी इंजिनिअरिंगने दत्तक घेण्यास सहमती दर्शविली असून ही राज्य सरकारची योजना आहे. इन्स्टिट्यूटची क्षमता, भौतिक व शैक्षणिक संसाधने तसेच रिक्त पदांचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेता प्रत्येक इन्स्टिट्यूटची संक्षिप्त माहिती संकलित करून बुकलेटच्या स्वरूपात येत्या ८ ते १० दिवसांत तयार करणे आवश्यक आहे. या बुकलेटच्या आधारे नियमित पाठपुरावा करत माननीय मंत्री महोदयांसोबत बैठका घेऊन राज्य शासन, डीपीडीसी, खनिज विकास निधी तसेच काही सीएसआर निधीचा योग्य वापर करून तांत्रिक कौशल्य विकासाला चालना द्यावी. या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राला आवश्यक असलेले तांत्रिक ज्ञान व कौशल्य प्राप्त होईल आणि उद्योगांच्या गरजेनुसार कुशल ‌व सक्षम मनुष्यबळ घडविण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरेल.
ड्रोनचा विविध पद्धतीने उपयोग होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर ड्रोन ऑपरेटरचा दोन महिन्यांचा कोर्स सुरू करण्यात येत आहे. पिकांवर हाताने फवारणी आणि ड्रोणद्वारे फवारणी याबाबत कृषी अधिकाऱ्यांकडून तुलनात्मक तक्ता तयार करण्यात यावा. महिला सहकारी संस्थांच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना ड्रोनचे प्रशिक्षण देणे शक्य असून, भविष्यात या बचत गटांना ड्रोन उपलब्ध करून देण्याचाही विचार करण्यात येईल.”
उद्योग क्षेत्राशी समन्वय साधण्यासाठी उद्योग राज्यमित्र चंद्रपुरात आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उद्योगांनी आवश्यक मनुष्यबळाची मागणी कळविल्यास त्याअनुषंगाने, संबंधित दर्जाचे प्रशिक्षण देणे शक्य होईल या माध्यमातून तांत्रिक कौशल्य प्राप्त तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असेही श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here