लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशनकडून उसगाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

7

लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशनकडून उसगाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन



उसगाव (चंद्रपूर): लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनने त्यांच्या सामाजिक दायित्व (CSR) विभागांतर्गत आरोग्य सेवा ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून, २५ ऑगस्ट २०२५ रोजी उसगाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरामुळे गावातील लोकांना त्यांच्या डोळ्यांची तपासणी आणि योग्य उपचार गावातच घेता आले.
या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याला लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. प्रशांत पुरी उद्घाटक म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये गावच्या सरपंच सौ. निवेदिता ठाकरे, लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या सहायक महाप्रबंधक विद्या पाल, नेत्र तपासणी अधिकारी श्री. राजेंद्र लाडे, ग्रामपंचायत उपसरपंच श्री. मंगेश आसुटकर, सुदर्शन झुंझुनवार, ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या सहायक महाप्रबंधक विद्या पाल यांनी शिबिराची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, केवळ उसगावच नव्हे तर २३ सप्टेंबर २०२५ पर्यंत बेलसणी, मुरसा, पांढरकवडा, अंतुर्ला, शेणगाव, वढा, नकोडा, आणि धानोरा पिंपरी यांसारख्या इतर गावांमध्येही असेच नेत्र तपासणी शिबिर आणि चष्मे वाटपाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यामुळे अनेक गरजू ग्रामीण नागरिकांना डोळ्यांच्या आरोग्यासाठी मदत मिळेल.
कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. प्रशांत पुरी यांनी त्यांच्या भाषणात लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. ते म्हणाले की, लॉयड्स नेहमीच समाजासाठी तत्पर राहील आणि भविष्यातही अशाच प्रकारे विविध सामाजिक कार्य करत राहील. नेत्र तपासणी अधिकारी श्री. राजेंद्र लाडे यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी आणि डोळ्यांच्या आजारांवर प्रतिबंध कसा करावा, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. या शिबिराचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावात आवश्यक आरोग्य सेवा पुरवणे हा होता.
या शिबिराचा लाभ १८८ नागरिकांनी घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अनुराग मत्ते यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीरंग पोतराजे यांनी केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. लता बावणे, सौ. प्रिया पिंपळकर आणि सौ. अश्विनी खोब्रागडे यांनी विशेष परिश्रम घेतले. लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमामुळे ग्रामीण भागातील डोळ्यांच्या आरोग्याच्या समस्यांवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here