सर्वधर्मीय महाआरतीतून घुग्घुस वासियांनी दिला ऐक्याचा अनोखा संदेश
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सर्वधर्मीय महाआरती संपन्न
*चंद्रपूर, दि. 2: चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस येथे जय श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय महाआरतीमध्ये हिंदू, मुस्लिम, शिख, बौद्ध आणि ईसाई समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत एकत्रितपणे आरती केली. आणि ‘मिनी भारत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घुग्घूस व बल्लारपूरच्या सामाजिक एकात्मतेची गौरवशाली परंपरा पुन्हा अधोरेखित केली. श्रद्धा, सौहार्द आणि बंधुभावाचा हा अद्वितीय सोहळा घडवून आणणारी सर्वधर्मीय महाआरती म्हणजे ऐक्याचे जिवंत प्रतीकच असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.*
याप्रसंगी आमदार देवराव भोंगळे, विवेक बोढे, सर्व धर्मीय नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, समाजातील सर्व जाती-धर्मातील नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा ऐक्य, प्रेम व सौहार्दाचा प्रतीक ठरला आहे. घुग्घूस व बल्लारपूर भूमीवर माझे विशेष प्रेम नेहमीच राहिले आहे. कारण या नगरांना मिनी भारत म्हणणे योग्यच ठरेल. येथे राज्यातील विविध धर्म, जाती आणि संस्कृतीचे लोक आपापल्या परंपरा जपत एकत्र नांदतात, हाच या भूमीचा खरा आत्मा आहे.
सामाजिक ऐक्य, परस्पर सन्मान आणि बंधुभाव या गुणांनी घुग्घूस व बल्लारपूरची ओळख अधिक समृद्ध झाली आहे. श्रीगणरायाच्या कृपेने हा बंधुभाव अजून दृढ व्हावा आणि आपल्या जिल्ह्यात शांती, सौख्य व समृद्धी नांदावी, हीच माझी प्रार्थना आहे, असे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.