क्षयरुग्णांना लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन पौष्टिक आधार; पोषण किटचे चंद्रपूरात वितरण
चंद्रपूर: क्षयरोग (Tuberculosis) उपचारादरम्यान रुग्णाला योग्य औषधोपचार यासोबतच पौष्टिक आहाराची नितांत गरज असते. ही महत्त्वपूर्ण गरज लक्षात घेऊन लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनने आपली सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा क्षयरोग केंद्र, चंद्रपूर येथे क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप केले. उपचारादरम्यान रुग्णांचे आरोग्य सुधारणे आणि त्यांना शारीरिक बळ मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या महत्त्वपूर्ण वाटप समारंभात जिल्हा क्षयरोग अधिकारी मा.डॉ.ललितकुमार पटले यांच्यासह डॉ. कोमल मुनेश्वर (तालुका आरोग्य अधिकारी) आणि डॉ. माधुरी टोंगे (वैद्यकीय अधिकारी) यांची प्रमुख उपस्थिती होती. लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनचे उपव्यवस्थापक दीपक साळवे व श्रीरंग पोतराजे हे देखील याप्रसंगी उपस्थित होते.
प्रथिनेयुक्त आहाराचा समावेश
वाटप करण्यात आलेल्या पोषण आहार किटमध्ये विशेषत्वाने प्रथिने (Proteins) आणि ऊर्जा देणाऱ्या वस्तूंचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये तूर, मसूर, मोठं, चणा, मूग, राजमा, सोयाबीन वडी, गूळ, खजूर तसेच शेंगदाणा, चिक्की आणि इतर प्रोटीनयुक्त अन्नधान्याचा समावेश होता. या पौष्टिक आहाराने रुग्णांची शारीरिक ताकद वाढण्यास मदत होईल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
सामाजिक पाठबळ प्रशंसनीय – डॉ. पटले
या सामाजिक कार्याबद्दल जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललितकुमार पटले यांनी लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनचे विशेष आभार मानले. “क्षयरोग निर्मूलनासाठी शासन विविध योजना राबवत आहे, परंतु त्यासोबत अशा प्रकारचे सामाजिक पाठबळ मिळणे अत्यंत कौतुकास्पद आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच, समाजातील सर्व घटकांनी अशा समाजोपयोगी कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनचे उपव्यवस्थापक दीपक साळवे यांनी यावेळी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. ‘फाउंडेशन सामाजिक जबाबदारी अंतर्गत आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सातत्याने काम करत असून, समाजातील दुर्बल घटकांना मदत करणे हे आमचे ध्येय आहे,’ असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथील पर्यवेक्षक श्री खिरेंद्र पाझारे यांनी केले, तर श्री सुरेश कुंभारे यांनी आभार प्रदर्शन केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या धनंजय पिंपळशेंडे आणि आदित्य मोहितकर यांनी अथक परिश्रम घेतले.
लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनने हाती घेतलेल्या या उपक्रमाने सामाजिक उत्तरदायित्वाचे एक उत्कृष्ट उदाहरण समाजात घालून दिले आहे.










