लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनतर्फे नकोडा गावात जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन व चष्मे वितरण उपक्रम

9

लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनतर्फे नकोडा गावात जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन व चष्मे वितरण उपक्रम



 गावकऱ्यांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल


   घुग्घुस : नकोडा (जि. चंद्रपूर):
लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनने त्यांच्या सामाजिक दायित्व (Corporate Social Responsibility) उपक्रमांतर्गत नकोडा गावातील नागरिकांसाठी आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने दोन अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले. मंगळवार, दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी जलशुद्धीकरण केंद्राचे (Water Purification Plant – RO ATM Plant) उद्घाटन तसेच चष्मे वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनच्या सहायक महाप्रबंधक विद्या पाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच श्री. किरण बांदूरकर, उपसरपंच श्री. मंगेश राजगडकर, श्री अनुराग मत्ते,पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाला उत्साही वातावरण लाभले.
कार्यक्रमादरम्यान बोलताना विद्या पाल म्हणाल्या,
“गावातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पेयजल सहज उपलब्ध व्हावे आणि दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवता यावे, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा हा केवळ आरोग्याशी संबंधित प्रश्न नसून, तो एक सामाजिक जबाबदारीचा भाग आहे.”
या जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून सुमारे ४५०० नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळणार आहे. या केंद्राच्या कार्यान्वयनानंतर ३०० कुटुंबांना स्मार्ट कार्ड्स वाटप करण्यात आले असून, या कार्ड्सच्या माध्यमातून गावकरी नियमितपणे RO केंद्रातून स्वच्छ आणि फिल्टर केलेले पाणी घेऊ शकतील. या उपक्रमामुळे गावातील पाण्याची गुणवत्ता सुधारेल, दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये घट येईल आणि नागरिकांचे एकूणच आरोग्य सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन केवळ पाणीपुरवठ्यापुरते मर्यादित न राहता आरोग्याच्या सर्व अंगांना स्पर्श करत आहे. याचाच भाग म्हणून या दिवशी चष्मे वितरण शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले. या शिबिरात ४२३ नागरिकांची डोळ्यांची तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वितरित करण्यात आले. ग्रामीण भागात वाढत्या दृष्टीदोषांच्या समस्येवर उपाय म्हणून हा उपक्रम विशेष महत्त्वाचा ठरला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनचे श्रीरंग पोतराजे, धनंजय पिंपळशेंडे, अभिजित चौधरी, ममता मोरे आणि मंजुषा वडस्कर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वय आणि प्रयत्नांमुळे हा प्रकल्प यशस्वीरित्या राबविणे शक्य झाले.
गावकऱ्यांनी या दोन्ही उपक्रमांचे मनःपूर्वक स्वागत केले. कार्यक्रमानंतर गावातील नागरिकांनी फाउंडेशनच्या प्रतिनिधींचे आभार मानले आणि अशा सामाजिक प्रकल्पांनी गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे सांगितले.
लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनने आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक जनजागृती यांसारख्या क्षेत्रांत आधीपासूनच अनेक उपक्रम राबवले आहेत. नकोडा गावातील हा उपक्रम त्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून फाउंडेशनने सामाजिक उत्तरदायित्वाचे एक उत्कृष्ट उदाहरण घालून दिले असून, स्वच्छ पाणी आणि दृष्टीसंपन्न आरोग्य या दोन्ही बाबींच्या दिशेने नकोडा गावाला एक नवी ऊर्जा आणि नवा आरंभ मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here