घुग्घुस परिसरात ACC अदानी सीमेंट कंपनीच्या कार्यपद्धतीमुळे शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केला जात आहे. माउंट इंग्रजी शाळेच्या अगदी २०० मीटर अंतरावर कंपनीकडून कोळसा स्टॉक, सिमेंट गिटी तसेच अवैध वाहतूक केल्याचा आरोप करण्यात येत असून, यामुळे निर्माण होणारा धूर व धुळीचे प्रदूषण थेट विद्यार्थ्यांच्या श्वसन आरोग्यावर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कंपनी नियमांचे उल्लंघन करत अवैधपणे साठवण आणि वाहतूक करत आहे. शाळेजवळ मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असून त्याचे गंभीर परिणाम भविष्यात विद्यार्थ्यांना भोगावे लागणार आहेत.” असे आरोप करण्यात येत आहेत.
सिमेंट कंपनीमध्ये येणारी व जाणारी रेल्वेगाड्या सतत ये-जा करत असल्याने कंपनीचे गेट वारंवार बंद केले जाते. यामुळे शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना, रुग्णांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, कधी कधी लोकांना दीर्घकाळ गेटसमोर अडकून राहावे लागते,” असा गंभीर आरोपही स्थानिकांनी केला आहे.
कंपनीच्या कथित गैरजबाबदारपणामुळे यापूर्वी ऊसगाव येथील तरुण मनोज राजुरकर यांचा अपघाती मृत्यू झाला होता. या क्षेत्रातील जुना रस्ता कंपनीने बंद करून नवीन रस्ता तयार केल्याने हा अपघात घडल्याचा स्थानिकांचा दावा आहे. या घटनेनंतरही कंपनी प्रशासनाने परिस्थिती सुधारण्याऐवजी मनमानी सुरूच ठेवल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
तसेच, शाळेजवळील कोळसा व सिमेंट साठवणीमुळे निर्माण होणाऱ्या सूक्ष्म धुळीकणांचा परिणाम सर्वाधिक मुलांवर होऊ शकतो. “वेळेत उपाययोजना केल्या नाहीत तर श्वसनसंस्थेचे आजार, ऍलर्जी, दमा यांसारखे गंभीर आजार विद्यार्थ्यांना होईल,” अशी भीती पालकांनी व्यक्त केली आहे.
प्रदूषणामुळे परिसरातील हवा सतत ढगाळ व धुळकट राहते, तर वाहनांची अवैधरीत्या वर्दळ वाढल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा कंपनी प्रशासनाकडे तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
घुग्घुसमधील नागरिकांनी प्रशासन व प्रदूषण विभागाकडून तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. “शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात आहे. वेळेत उपाय न केल्यास मोठा आंदोलनात्मक पाऊल उचलले जाईल,” असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
या गंभीर विषयाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन शाळेजवळील प्रदूषण, वाहतूक आणि साठवणीवर नियंत्रण ठेवावे, अशी जोरदार मागणी सध्या घुग्घुस परिसरातून होत आहे.