लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनतर्फे शाळा व्यवस्थापन समितीचा अभ्यास दौरा जिल्हा परिषद शाळा, पालडोह येथे संपन्न
आदर्श शाळा पाहून स्वतःच्या शाळेचा विकास गतिमान करण्याची तयारी
जिवती (चंद्रपूर) : ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, शाळांमध्ये नवकल्पनांचा प्रसार करणे आणि व्यवस्थापन समित्यांना सक्षम बनवणे या उद्देशाने लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनतर्फे म्हातारदेवी शेणगाव गावातील शाळा व्यवस्थापन समितीचा अभ्यास दौरा जिल्हा परिषद शाळा, पालडोह (तालुका जिवती) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या भेटीदरम्यान पालडोह शाळेचे मुख्याध्यापक श्री. परतिकी यांनी शाळेची सविस्तर माहिती, तिची कार्यपद्धती, नवकल्पनात्मक उपक्रम आणि शाळेने साधलेली उल्लेखनीय प्रगती समिती सदस्यांसमोर मांडली. विशेष म्हणजे ही शाळा ३६५ दिवस सतत सुरू असणारी आदर्श शाळा असून गडचांदूर परिसर तसेच आजूबाजूच्या गावांमधील विद्यार्थी येथे नियमितपणे शिक्षणासाठी येतात.
शैक्षणिक उपक्रमांची रचना, उपस्थिती वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती, डिजिटल व खेळ आधारित शिक्षण, शाळेच्या पायाभूत सुविधांचा विकास, पोषण आणि आरोग्यविषयक उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवले जाणारे कार्यक्रम याबाबत मुख्याध्यापकांनी अतिशय प्रेरणादायी माहिती दिली.
यावेळी शाळा प्रत्यक्ष पाहून समिती सदस्यांनी आपल्या गावातील शाळेला अधिक सक्षम, समृद्ध आणि आदर्श बनवण्यासाठी कोणते उपक्रम राबवता येतील, शाळेत कोणते बदल करता येतील, विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा कशा देता येतील याविषयी उत्साहाने चर्चा केली.
लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनतर्फे या पुढील काळात अशा आदर्श शाळांच्या धर्तीवर आपल्या परिसरातील शाळा विकसित करण्यासाठी आवश्यक ते नियोजन, मार्गदर्शन व सहकार्य दिले जाईल, असेही संस्थेने स्पष्ट केले. ग्रामीण शिक्षणाच्या उन्नतीसाठी फाऊंडेशनकडून हा एक सकारात्मक आणि उपयुक्त उपक्रम असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
अभ्यास दौऱ्यात केंद्रप्रमुख श्री. अनिल दागमवार, म्हातारदेवी शेणगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच फाऊंडेशनचे प्रतिनिधी कु. स्नेहा रणदिवे आणि श्री. निरज काळे उपस्थित होते.
या अभ्यासदौऱ्यामुळे शाळा व्यवस्थापन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, सुविधा व्यवस्थापन, शालेय उपक्रमांचे नियोजन आणि शिक्षक–समिती समन्वय याबाबत मौल्यवान अनुभव मिळाल्याची प्रतिक्रिया सर्व उपस्थितांनी व्यक्त केली. लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनच्या अशा उपक्रमांमुळे ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला नवे बळ मिळून विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या घडणीत महत्त्वपूर्ण योगदान मिळत असल्याचे सर्वांनी सांगितले.