रामकथा ही प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचली पाहिजे- आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार

9

रामकथा ही प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचली पाहिजे- आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार



श्रीरामकथेच्या निमित्ताने चंद्रपुरात भव्य शोभायात्रा


चंद्रपूर, दि. 13 : रामकथेच्या माध्यमातून संस्कार, अस्मिता आणि मर्यादांचे महत्त्व समाजमनात दृढपणे रुजते. पितृधर्माचे पालन करणारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम हे आदर्श पुत्र असून, त्यांचे जीवन मानवतेला योग्य दिशा देणारे आहे.दि. १४ ते २२ जानेवारी या कालावधीत दररोज दुपारी ३.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत श्री लखमापूर धाम, चांदा क्लब ग्राऊंड, चंद्रपूर येथे ही श्रीरामकथा पार पडणार आहे. त्यामुळे जीवनातील नऊ दिवस श्रीरामकथा श्रवणासाठी अर्पण करून ही पवित्र कथा प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.*

श्रीरामकथेच्या पावन निमित्ताने लक्ष्मीनारायण मंदिरापासून चांदा क्लब ग्राउंडपर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. या शोभायात्रेत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार, सौ.सपनाताई मुनगंटीवार आणि मोठ्या संख्येने रामभक्त सहभागी झाले होते. शोभायात्रेदरम्यान मोठ्या संख्येने रामभक्तांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली असून, संपूर्ण परिसर ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता.

मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र यांच्या पावन जीवनगाथेवर आधारित श्रीरामकथा दि. १४ ते २२ जानेवारी या कालावधीत भक्तिभावाने आयोजित करण्यात आली आहे. या पवित्र कथासोहळ्यात परमपूज्य श्री. राजनजी महाराज हे ग्रामकथेचे वाचक म्हणून उपस्थित राहून श्रीरामकथेचे रसपूर्ण व भावस्पर्शी कथन करणार आहेत.

यावेळी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “प्रभू श्रीराम हे संस्कार, अस्मिता, मर्यादा आणि पितृधर्माचे पालन करणाऱ्या आदर्श पुत्राचे प्रतीक आहेत. त्यांचे जीवन मानवतेला योग्य मार्गदर्शन करणारे आहे. रामकथा ही प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचली पाहिजे.कारण रामकथेतून जीवन जगण्याची योग्य दिशा, संस्कार आणि मूल्यांची खरी शिकवण मिळते.

या शोभायात्रेच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक मनापर्यंत प्रभू श्रीरामांची पावन कथा पोहोचवण्याचे महान कार्य झाले आहे. प्रभू श्रीराम हे संस्कारांचे प्रतीक, अस्मितेचे अधिष्ठान, मर्यादांचे पालन करणारे आणि पितृधर्म निष्ठेने निभावणारे आदर्श पुरुष आहेत. दुष्ट प्रवृत्तीचा नाश करणारे आणि संकटमुक्तीचा मार्ग दाखवणारे प्रभू राम प्रत्येक भक्ताच्या जीवनात संकटमोचक म्हणून सदैव उपस्थित असल्याचे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले. अयोध्येतील प्रभू श्रीराम भक्तांना ज्या महाद्वारातून आशीर्वाद देतात, ते महाद्वार चंद्रपूर येथून पाठविण्यात आलेल्या काष्ठापासून निर्माण झाले आहे.चंद्रपूरवासीयांसाठी हा गौरवाचा क्षण असल्याचेही आ.मुनगंटीवार म्हणाले.

समुद्र पार करण्यासाठी प्रभू श्रीरामांच्या सेनेने उभारलेला रामसेतू, ‘राम’ नाम अंकित दगडांचे पाण्यावर तरंगणे, तसेच रामकथेतील प्रत्येक शब्दातील अद्भुत शक्ती यांचा उल्लेख करत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी रामकथा प्रत्येक मनापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. सत्य आणि धर्माच्या विजयासाठी आवश्यक ती शक्ती रामकथेतूनच मिळते, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here