राजुरा तालुक्यातील पेलोरा–लहान मारडा रेती घाटावर अवैध वाळू तस्करीचा सुळसुळाट
महसूल व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
घुग्घुस :- राजुरा तालुक्यातील पेलोरा–लहान मारडा नदी पात्रातील रेती घाटावर मागील काही महिन्यांपासून अवैध वाळू तस्करी सर्रास सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत किमान आठ ट्रॅक्टरांच्या साह्याने नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा व वाहतूक करण्यात येत आहे. वाळू माफियांनी जेसीबी मशीनच्या साह्याने नदी पात्रात थेट मार्ग तयार करून शेकडो ब्रास वाळूची बिनधास्त वाहतूक सुरू ठेवली आहे.
या अवैध वाळू उपशामुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र, महसूल विभागाचे संबंधित अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का, असा सवाल स्थानिक नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. “मुग गिळून गप्प” राहण्याची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
याशिवाय, राजुरा पोलीस निरीक्षकांच्या आशिर्वादानेच हा अवैध धंदा क्षेञात अनेक टिकाती मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत असून, त्यामुळे वाळू माफियांचे मनोबल वाढले आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की, अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे मार्ग तत्काळ बंद करण्यात यावेत. वाहतुकीच्या मार्गांवर मोठे खड्डे करून ट्रॅक्टर व इतर वाहनांची ये-जा रोखावी, तसेच संबंधित वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी. पर्यावरण संरक्षण व महसूल सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस पावले उचलण्यात यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी केली आहे,