लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे जिल्हा परिषद शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी भव्य व प्रेरणादायी कला व हस्तकला कार्यशाळा संपन्न
मुरसा :- लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी आणि सर्जनशील कला व हस्तकला कार्यशाळा फार्मर ट्रेनिंग सेंटर, मुरसा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या उपक्रमात घुग्घुस परिसरातील घुग्घुस व मारडा या दोन केंद्रांतील एकूण २२ जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे ७० शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेला नवे आयाम दिले. जी. डी. गोएंका लॉयड्स पब्लिक स्कूलचे कला व हस्तकला शिक्षक श्री. हरदेवसिंह परमार यांनी संपूर्ण कार्यशाळेचे प्रभावी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, घुग्घुस येथील वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. प्रशांत पुरी यांनी उपस्थित राहून सहभागींचे मनोबल वाढवले. तसेच लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या सी. एस. आर. ए. जी. एम. विद्या पाल आणि शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे सेंटर हेड श्री. आदित्य कदम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रेरणा दिली.
ही कार्यशाळा दोन सत्रांत पार पडली. पहिल्या सत्रात ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबविण्यात आला. टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त, सुंदर व पर्यावरणपूरक कलाकृती तयार करून विद्यार्थ्यांनी पुनर्वापर व पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. दुसऱ्या सत्रात श्री. परमार यांनी विविध हस्तकला प्रकारांचे महत्त्व, उद्दिष्टे तसेच त्यांचा शैक्षणिक व व्यावहारिक उपयोग सविस्तरपणे समजावून सांगत विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कलाकृती तयार करून घेतल्या.
कार्यशाळेनंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी फार्मर ट्रेनिंग सेंटरमधील डेमो प्लॉट्सना भेट देऊन तेथे चालू असलेल्या कृषी प्रशिक्षण उपक्रमांची माहिती घेतली. आधुनिक शेती पद्धती, पीक व्यवस्थापन, सेंद्रिय शेती व शाश्वत कृषी उपक्रमांबाबत त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
कार्यक्रमाच्या शेवटी कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेतलेल्या प्रत्येक शाळेला प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशील विचारसरणी आणि कौशल्य विकासाला मोठी चालना मिळाली. शिक्षकांसाठीही अध्यापनात कला व उपक्रमाधारित शिक्षणाचा समावेश कसा करता येईल याचे प्रभावी मार्गदर्शन मिळाले. सहभागी सर्वांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच कला, पर्यावरण संवर्धन आणि कृषी शिक्षणालाही नवी दिशा मिळाली असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम निश्चितच मैलाचा दगड ठरला आहे.