घुग्घुस (जि. चंद्रपूर) — शुद्ध व थंड पिण्याचे पाणी देण्याच्या उद्देशाने उभारलेले जलधारा केंद्र (RO प्लांट) आज स्वतःच प्रश्नचिन्हाखाली आले आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून नागरिकांकडून दरमहा २०० रुपये शुल्क आकारले जात असताना, या प्लांटमधून निर्माण होणारे वेस्टेज पाणी थेट नालीत सोडले जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.
पाणी बचतीचे मोठमोठे स्लोगन — “पाणी वाचवा, पाणी तुम्हाला वाचवेल”, “जल है तो कल है”, “जल ही जीवन है” — भिंतीवर झळकत असताना प्रत्यक्षात मात्र पाण्याची उघडपणे नासाडी होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
❖ वेस्टेज पाण्याचा पुनर्वापर का नाही?
RO प्रक्रियेत निर्माण होणारे पाणी पूर्णपणे वाया जाणारे नसून ते स्वच्छता, बागकाम, सार्वजनिक स्वच्छतागृह, रस्ते धुणे आदी कामांसाठी वापरता येऊ शकते. मात्र येथे साठवण टाकीची योग्य व्यवस्था नसल्याने पाणी थेट नालीत वाहत आहे.
याहूनही गंभीर बाब म्हणजे साठवण टाकीत घाण, कचरा, शेवाळ साचलेले दिसून येत आहे.
❖ मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांचे दुर्लक्ष? पाणीपुरवठा सभापती यांचे याकडे दुर्लक्ष का?
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, या गंभीर प्रकाराकडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांचे दुर्लक्ष होत आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक थेंब महत्वाचा असताना, अशा प्रकारे पाण्याची नासाडी होणे ही प्रशासनाच्या नियोजनशून्यतेची जिवंत साक्ष असल्याचे मत व्यक्त होत आहे.
❖ नागरिकांची ठाम मागणी
वेस्टेज पाण्याचे तातडीने साठवण व पुनर्वापर व्यवस्था करावी
साठवण टाक्यांची नियमित स्वच्छता व देखभाल करावी
संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी
“थेंब थेंब पाणी अमूल्य आहे,” अशी भूमिका घेत नागरिकांनी नगरपरिषदेला जागे होण्याचे आवाहन केले आहे.
पाणी बचतीचे संदेश फलकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची हीच वेळ आहे — अन्यथा ‘जल आहे तरच कल आहे’ ही घोषणा केवळ दिखावा ठरेल, अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.