औषध साक्षरता अभियानांतर्गत रुग्णांना वेळेवर उपचारांचे महत्त्व पटवून देण्यावर भर*
चंद्रपूर : लॉयडस इन्फिनाइट फाऊंडेशन यांच्या सामाजिक उपक्रमांतर्गत क्षयरोग (टीबी) जनजागृतीसाठी शेतकरी प्रशिक्षण केंद्र, मुरसा येथे विशेष सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. याच कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा ड्रॅगिस्ट केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिशन यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या औषध साक्षरता अभियानाअंतर्गत उपस्थितांना औषधांविषयी सविस्तर व उपयुक्त माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमास एकूण ५२ आशा कार्यकर्त्या मोठ्या उत्साहाने उपस्थित होत्या. क्षयरोगाची प्रमुख लक्षणे, वेळेवर तपासणीचे महत्त्व, उपलब्ध उपचार पद्धती, औषधांचा नियमित व संपूर्ण कालावधीपर्यंत वापर तसेच उपचार अर्धवट न सोडण्याची आवश्यकता या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. क्षयरोगाबाबत शास्त्रीय व मार्गदर्शक माहिती देत डॉ.ललित पटले, जिल्हा क्षयरोग अधिकारी, चंद्रपूर यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. क्षयरोगाची लवकर ओळख होऊन वेळेवर उपचार सुरू केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि समाजात या आजाराचा प्रसार रोखता येतो, यावर त्यांनी विशेष भर दिला.
तसेच औषध साक्षरता अभियानाअंतर्गत औषधे योग्य पद्धतीने कशी घ्यावीत, औषधांचे फायदे व तोटे, तसेच औषधांचा अति वापर टाळण्याचे महत्त्व याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. वैद्यकीय सल्ल्यानुसारच औषधे घेणे आवश्यक असून औषधांचा गैरवापर टाळणे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये मा. तालुका आरोग्य अधिकारी मुनेश्वर, सहाय्यक महाप्रबंधक डॉ विद्या पाल, वैद्यकीय अधिकारी डॉ प्रिती , डॉ माधुरी टोंगे, डॉ. आदित्य कदम तसेच चंद्रपूर जिल्हा ड्रॅगिस्ट केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट असोसिशन संघटनेचे अध्यक्ष बंटी घाटे , रणजित दांडेकर प्रियंका इस्वार भारती वनकर , साहस साधकर आणि उज्वला घाटेयांचा समावेश होता.
कार्यक्रमादरम्यान आशा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध प्रश्न विचारले व आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. समुदायस्तरावर क्षयरोग प्रतिबंधासाठी जनजागृती करणे, संशयित रुग्णांना तपासणी व उपचारांसाठी प्रवृत्त करणे, औषधांचे महत्त्व पटवून देणे तसेच उपचार पूर्ण होईपर्यंत रुग्णांचे समुपदेशन करणे ही आशा कार्यकर्त्यांची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असल्याचे मान्यवरांनी अधोरेखित केले.
एकूणच, हा उपक्रम क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि प्रभावी पाऊल ठरला असून, भविष्यात अशा प्रकारचे जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विद्या पाल यांनी करून लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन अनुराग मते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निरज काळे, गौरव जाना, डॉ. पायल कोंडेकर, डॉ. मानसी पेटकुले, डॉ. स्नेहा बक्षी, प्रिया पिंपळकर, ममता मोरे व मंजुषा वडस्कर यांनी विशेष परिश्रम घेतले.