विधवा महिलांसाठी स्वावलंबनाची नवी पहाटलॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन मार्फत २० महिलांना शेळीपालन युनिट वाटप; ग्रामीण अर्थचक्राला नवी गती

21
  • विधवा महिलांसाठी स्वावलंबनाची नवी पहाटलॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन मार्फत २० महिलांना शेळीपालन युनिट वाटप; ग्रामीण अर्थचक्राला नवी गती

    घुग्गुस (जि. चंद्रपूर):

    ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन, घुग्गुस यांच्या वतीने विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक प्रभावी व दूरदृष्टीपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक दायित्व उपक्रमांतर्गत एकूण २० विधवा महिलांना शेळीपालन युनिटचे वाटप करून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शाश्वत व दीर्घकालीन उत्पन्नाचा मार्ग खुला करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विविध गावांतील महिलांची निवड करून त्यांना प्रत्येकी १ बोकड व ४ गाभण बकर्‍या असे एक संपूर्ण शेळी युनिट प्रदान करण्यात आले. गावनिहाय लाभार्थी महिलांची संख्या पुढीलप्रमाणे आहे, पांढरकवडा – ४ महिला, वढा – ३ महिला, मातारदेवी – १ महिला, शेणगाव – ५ महिला, उसगाव – ३ महिला, मुरसा – २ महिला, बेलसनी – २ महिला, एकूण २० महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून, या माध्यमातून त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचा ठोस प्रयत्न करण्यात आला आहे. 

    केवळ शेळी वाटपावर न थांबता, फाउंडेशनतर्फे महिलांना व्यावहारिक शेळीपालन प्रशिक्षण देखील देण्यात आले. महिला बचत गटाच्या माध्यमातून आयोजित प्रशिक्षण सत्रात खालील विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले – शेळी संगोपन व पोषण व्यवस्थापन, लसीकरण व रोग प्रतिबंधक उपाययोजना, चारा नियोजन व साठवणूक, स्वच्छता व गोठा व्यवस्थापन, बाजारपेठेची माहिती व विक्री तंत्र, नोंदवही व आर्थिक नियोजन. या प्रशिक्षणामुळे महिलांना व्यवसाय केवळ सुरू करण्यापुरता मर्यादित न राहता तो यशस्वीपणे चालविण्याचा आत्मविश्वास प्राप्त झाला आहे. शेळीपालन हा व्यवसाय ग्रामीण भागासाठी अत्यंत अनुकूल मानला जातो. कमी भांडवलात सुरू होणारा, अल्प कालावधीत उत्पन्न देणारा व पशुधन वाढीमुळे दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य निर्माण करणारा हा व्यवसाय महिलांसाठी विशेषतः उपयुक्त ठरतो. काही महिन्यांतच पिल्लांची संख्या वाढल्याने महिलांना शेळ्यांच्या विक्रीतून थेट उत्पन्न मिळण्यास सुरुवात होईल. भविष्यात शेळी युनिटचा विस्तार करून नियमित आर्थिक चक्र निर्माण करण्याची संधी देखील या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. हा उपक्रम केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून तो सामाजिक सक्षमीकरणाचा प्रभावी नमुना ठरत आहे. 

    विधवा महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, कुटुंबाच्या आर्थिक निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढविणे आणि पुढील पिढीसाठी सकारात्मक आदर्श निर्माण करणे हा या उपक्रमाचा मूलभूत उद्देश आहे. स्थानिक पातळीवर या उपक्रमाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले असून, लाभार्थी महिलांनी फाउंडेशनप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. ग्रामीण विकासाच्या दिशेने उचललेले हे पाऊल इतर महिलांसाठीही प्रेरणादायी ठरणार असून, घुग्गुस परिसरात स्वावलंबनाची नवी चळवळ निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here