राजुरा अशोक ठक्करच्या वाहनातुन 3 लाख 36 हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त
चंद्रपुर गुन्हे शाखेची कारवाई
- चंद्रपुर :-जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मोहीम सुरू केली आहे. 20 मार्च 2024 रोजी मोहिमेदरम्यान गस्त घालत असताना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली. त्यामध्ये राजुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मस्जिद वॉर्डात राहणारे अशोक ठक्कर यांनी त्यांच्या एमएच 34 बीआर 1623 क्रमांकाच्या चारचाकी वाहनात बेकायदेशीरपणे फ्लेवरयुक्त तंबाखूचा साठा कारमध्ये विक्रीसाठी ठेवला होता.
माहितीच्या आधारे वाहनाची तपासणी केली असता अवैध फ्लेवरचा तंबाखू आढळून आला. यामध्ये 5 पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये 1 लाख 86 हजार 800 रुपये किमतीचा माजा तंबाखू, 11 पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये 1 लाख 11 हजार रुपये किमतीचा इगलहूक्का शिशा तंबाखू, 5 लाख रुपये किमतीचे सुझुकी वॅगनार वाहन, असा एकूण 8 लाख 36 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. राजुरा पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा कायदा 2006 चे कलम 328, 188, 272, 273, कलम 30 (2), 26 (2) (अ) 3, 4, 59 नुसार गुन्हा क्रमांक 214/2024 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजुरा पोलीस पुढील तपास करत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, सपोनि विकास गायकवाड, पोहवा अनूप डांगे, पोहवा मिलिंद चव्हाण यांनी केली आहे.