राजूर येथील राजीव गांधी चौकातील महिलांचे पाण्यासाठी ग्रा. पं. ला निवेदन
हातपंप दुरुस्ती होईस्तोवर टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी
____________________
वणी : येथून ७ किमी अंतरावर असलेल्या राजूर कॉलरी येथील वॉर्ड क्र. ३ येथील राजीव गांधी चौकातील हातपंप गेल्या महिनाभरापासून नादुरुस्त झाल्याने टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करणारे निवेदन येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक चहानकर यांना राजीव गांधी चौकातील महिलांनी दिले आहे.
भर उन्हाळ्यात ज्यावेळेस पाण्याची गरज जास्त असते अश्या वेळेस महिनाभरापासून हातपंप खराब झाल्याने राजीव गांधी चौकातील कष्ट करणाऱ्या महिलांना अतोनात त्रास होत आहे. परिणामी येथील महिला ईशान गोल्ड चुना कंपनी कडून रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी पाणी टाकणाऱ्या टँकर चे पाणी घेत आहेत हे लक्षात येताच ते पाणी देणे ही कंपनीने बंद केले. त्यानंतर ग्रा. पं. ने सुद्धा दोन दिवस टँकरने पाणी पुरवठा करून ते ही बंद केले. हातपंप दुरुस्त केले परंतु ते ही थातूरमातूर केले असल्याने हातपंपातून पाणी उपसने त्रास दायक ठरला आहे. कितीतरी पंप मारल्यानंतर हातपंपातून पाणी निघते. त्यामुळे जोपर्यंत हातपंप योग्यरीत्या दुरुस्त होत नाही तोपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी निवेदनाद्वारे राजीव गांधी चौकातील कविता राकेश उईके, सायदा रफिक सय्यद, रजिया अकील कुरेशी, रेहाना शाहिद सय्यद, हलिमा शेख कादिर, शेवंता गंगाधर निर्मलकर, आशा नुर अली, रजिया युसुफ अली, नसीम असिफ अली, गौशिया शेख लतिफ, नजमा युसुफ शेख, रेशमा गफ्फर शेख, शागुफ्ता इदरिष शेख, हिना सलीम शेख, सरस्वती मेश्राम, संगीता दीपक उईके यांनी केली आहे.
यावेळेस ग्रामसेवक चहानकर यांनी मागणी करणाऱ्या महिलांना ताबडतोब हातपंप दुरुस्त करून देण्याची हमी दिली. तसेच दोन लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असून ते पूर्ण झाल्यास व गावात पुन्हा चार ठिकाणी ट्युबवेल खणून ते पाणी नळाद्वारे घरोघरी पोहोचविण्यात येईल असेही सांगितले. परंतु महिलांनी दोन दिवसात हातपंप दुरुस्त न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.