घुग्घुस नगरपरिषदेत सत्ताधाऱ्यांच्या ‘कलहा’चा अंक; विकासाचा गाडा रुतणार?

11

घुग्घुस नगरपरिषदेत सत्ताधाऱ्यांच्या ‘कलहा’चा अंक; विकासाचा गाडा रुतणार?



*सत्ताधाऱ्यांनी आपापसातील भांडणे सोडावीत, अन्यथा शहराचा विकास अशक्य!- भाजपा नगरसेवक विवेक बोढे


घुग्घुस, दि. ०७
नगरपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर तब्बल दीड महिन्याने झालेली पहिलीच सर्वसाधारण सभा विकासकामांच्या चर्चेऐवजी सत्ताधाऱ्यांच्या अभूतपूर्व गदारोळामुळेच गाजली.
काल (दि. ०६) फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या सभेमध्ये सत्ताधारी पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि वैयक्तिक हेवेदावे चव्हाट्यावर आल्याने, ‘शहराचा विकास की सत्ताधाऱ्यांची केबिन’ असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

सभेचे कामकाज सुरू होताच सत्ताधारी गटातच एकमेकांविरुद्ध जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. नगराध्यक्ष आणि सभापती यांच्यात अधिकारावरून सुरू असलेला वाद इतका टोकाला गेला की, सत्ताधारीच जणू विरोधकांची भूमिका बजावत असल्याचे चित्र सभेत दिसले. या गोंधळामुळे सभेतील गांभीर्य हरपले असून जनहिताचे प्रश्न बाजूला पडल्याचे दिसून आले.

या सर्व प्रकारावर भाजपा नगरसेवक विवेक बोढे यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना आपल्या अधिकारांची आणि कर्तव्यांची पुसटशीही जाणीव नाही. शहराच्या विकासासाठी ठोस भूमिका घेण्याऐवजी सत्ताधारी सभापती केवळ स्वतःच्या केबिनसाठी भांडत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. जोपर्यंत सत्ताधाऱ्यांमध्ये एकमत होत नाही आणि त्यांचे वैयक्तिक वाद थांबत नाहीत, तोपर्यंत घुग्घुस शहराचा विकास होणे अशक्य असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.

सत्ताधारी गट आपापसात लढत असताना, भाजपाने मात्र शहराच्या गरजा ओळखून आक्रमक पवित्रा घेतला आहे. विवेक बोढे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सभेमध्ये ५४ ते ५५ महत्त्वाचे विषय लावून धरले. यामध्ये शहरासाठी १,००० हून अधिक वीज दिवे उपलब्ध करून देणे आणि स्वच्छतेसाठी प्रत्येक प्रभागात १० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे अशा महत्त्वपूर्ण मागण्यांचा पाठपुरावा करण्यात आला.

या सभेत भाजपा गटनेत्या मिना मोरपाका,नगरसेवक आशिष माशिरकर,स्वीकृत नगरसेवक निरीक्षण तांड्रा आणि नगरसेविका वैशाली ढवस,चैताली सातपुते,मधू तिवारी,गणेश पिंपळकर यांनीही उपस्थित राहून सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेचा निषेध नोंदवला.

एकूणच, सत्ताधाऱ्यांच्या या अंतर्गत वादामुळे घुग्घुसच्या विकासकामांना खिळ बसण्याची भीती आता व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here