पदावर नसताना झालेल्या कामाचे खापर माजी सरपंच, उपसरपंच व सदस्यवर ढकलण्याचा प्रयत्न – बदनामीचे राजकारण थांबवण्याचे आवाहन*
घुग्घुस- येथून तेरा किलोमीटर अंतरावर असून, ताडाळी ग्रामपंचायत हद्दीतील कवडू उसाने ते ऊर्जाग्राम रोडवर सुरू असलेल्या खडीकरणाच्या कामात माती मिश्रित मुरूम टाकण्यात आल्याचा प्रकार गावातील काही नागरिकांनी व माध्यमांनी जनतेसमोर आणला, ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. गावाच्या विकासकामांचा दर्जा टिकावा यासाठी अशा चुका उघडकीस येणे गरजेचे असून या सजग भूमिकेचे आम्ही कौतुक करतो. असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मात्र याच मुद्द्याचा आधार घेऊन माजी सरपंच, उपसरपंच व सदस्यांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
माजी पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, 21 जानेवारी 2026 रोजी आम्ही कायदेशीररीत्या अपात्र ठरल्यानंतर ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार प्रशासक यांच्याकडे सुपूर्द झाला होता. त्यानंतरच्या कालावधीत संबंधित रस्त्यावर चुकीचे काम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या कामाची जबाबदारी ही पूर्णपणे प्रशासक काळातील यंत्रणेची आहे. त्या वेळी आम्ही पदावर नसल्याने या कामाशी आमचा कोणताही संबंध नाही.
30 जानेवारी 2026 रोजी तेथील नागरिकांकडून माहिती मिळताच आम्ही सामान्य नागरिक या नात्याने प्रशासक यांना लेखी अर्ज देऊन तातडीने काम थांबवण्याची व संबंधित कंत्राटदाराकडून दर्जेदार दुरुस्ती करून घेण्याची मागणी केली. आमच्या कार्यकाळातही चुकीची कामे आढळल्यास आम्ही ती थांबवून योग्य पद्धतीने करून घेतली आहेत. त्यामुळे सध्याच्या त्रुटींसाठी आम्हाला दोषी ठरवणे पूर्णपणे अन्यायकारक आहे.
काही व्यक्ती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय हेतूने खोट्या बातम्या पसरवत असून माजी लोकप्रतिनिधींची सामाजिक व राजकीय बदनामी करण्याचे कटकारस्थान रचत आहेत. जनतेच्या हितासाठी निकृष्ट काम उघडकीस आणणे योग्य असले तरी त्याआडून स्वतः स्वार्थापोटी निरपराध व्यक्तींवर भ्रष्टाचाराचे शिक्के मारणे चुकीचे आहे.
गावकऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, सत्य परिस्थिती समजून घ्यावी व गावाच्या विकासाला बाधा आणणाऱ्या राजकारणाला थारा देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची प्रशासकीय चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, अशी मागणीही माजी सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी केली आहे.
तसेच चुकीचे झालेले काम कंत्राटदाराकडून अंदाजपत्रक नुसार करून घेण्यात यावे असे आव्हान केले आहे.