चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे शैक्षणिक संस्थांच्या वेळांमध्ये बदल करावा*
*आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची सूचना*
*आ. सुधीर मुनगंटीवार यांचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सकाळच्या सत्रावर भर*
*आ. मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र; सकाळी १० वाजेपर्यंत शाळा सुरू असावी अशा सूचना*
*चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची गंभीर दखल घेत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे शैक्षणिक संस्थांच्या वेळांमध्ये तातडीने बदल करण्याची सूचना केली आहे. उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा वाढता धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.*
चंद्रपूर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक तापमान नोंदविणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक असून सध्या उन्हाचा तीव्र तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अशा परिस्थितीत दुपारच्या वेळेत शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
याच पार्श्वभूमीवर सकाळी १० नंतर उष्णतेची तीव्रता अधिक वाढत असल्याने जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल करून
सकाळी सुरू करून जास्तीत जास्त सकाळी १० वाजेपर्यंत शाळा सुरू असावी, अशा सूचना आ. मुनगंटीवार यांनी केल्या आहे.विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत आवश्यक असून प्रशासनाने याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.