८ ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे वितरण
जिल्हा परिषद चंद्रपुर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पुलकित सिंह (भा.प्र.से) यांच्या हस्ते चाव्या सुपूर्द; ग्रामीण भागात स्वच्छतेचा जागर
घुग्घूस (प्रतिनिधी):
ग्रामीण भागातील स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या वतीने परिसरातील ८ ग्रामपंचायतींना कचरा संकलनासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे वितरण करण्यात आले. मुरसा येथील शेतकरी प्रशिक्षण केंद्रात आयोजित एका शानदार सोहळ्यात मा. श्री. पुलकित सिंह (भा.प्र.से)चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या शुभहस्ते या इलेक्ट्रिक वाहनांच्या चाव्या सरपंचांना सुपूर्द करण्यात आल्या.
प्रदूषणमुक्त स्वच्छतेवर
याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री पुलकित सिंह (भा.प्र.से) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “ग्रामीण भागातील स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. ही वाहने प्रदूषणमुक्त (डिझेलमुक्त) असल्याने पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. ग्रामपंचायतींनी या वाहनांच्या माध्यमातून ओला व सुका कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करावे.”
शेतकऱ्यांना प्रगत शेतीचे आवाहन
याच कार्यक्रमात त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना एक महत्त्वाचे आवाहन केले. ते म्हणाले, “शेतकऱ्यांनी आता कापूस आणि सोयाबीन यांसारख्या पारंपरिक पिकांच्या चक्रातून बाहेर पडून शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण पिकांची कास धरावी. भाजीपाला लागवड आणि इतर आधुनिक प्रयोगांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नक्कीच भर पडेल.”
फाउंडेशनचा बहुआयामी विकास आराखडा
कार्यक्रमाला लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. प्रशांत पुरी यांनी आपल्या प्रास्ताविकात फाउंडेशनच्या कार्याची माहिती देताना सांगितले की, “लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन केवळ स्वच्छतेवरच नाही, तर शेती, आरोग्य, शिक्षण, जलसंवर्धन (शेततलाव निर्मिती) आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. तसेच, ग्रामीण तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्थेने एक सुसज्ज कौशल्य विकास केंद्र देखील उभारले आहे.” कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक महाप्रबंधक डॉ. विद्या पाल यांनी केले
लाभार्थी ग्रामपंचायती:
या उपक्रमांतर्गत खालील ८ गावांना कचरा संकलन वाहने मिळाली आहेत: उसगाव, मुरसा, म्हातारदेवी, पांढरकवडा, धानोरा, नकोडा, शेणगाव आणि वढा.
लोकसहभाग आणि उत्साह
कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने संकलन करून गावे निरोगी आणि स्वच्छ ठेवणे हा या उपक्रमाचा मूळ हेतू आहे. या कार्यक्रमाला लाभार्थी गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी फाउंडेशनच्या या सामाजिक बांधिलकीचे मनापासून स्वागत केले.