Home Breaking News “घुग्घुस ‘गॅस चेंबर’ बनलंय! प्रदूषणाच्या तडाख्यात नागरिक हैराण

“घुग्घुस ‘गॅस चेंबर’ बनलंय! प्रदूषणाच्या तडाख्यात नागरिक हैराण

70

“घुग्घुस ‘गॅस चेंबर’ बनलंय! प्रदूषणाच्या तडाख्यात नागरिक हैराण



” प्रशासन-राजकारण बेफिकीर!!”


घुग्घुस:
चंद्रपुर जिल्हातील औद्योगिक प्रगतीच्या नावाखाली घुग्घुस शहर आज अक्षरशः “गॅस चेंबर” बनले आहे. ५० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांचे जीवन असह्य झाले आहे. कारखान्यांतून बाहेर पडणारा काळा धूर, रासायनिक वायू आणि धुळीचे ढग यांनी संपूर्ण शहर झाकून टाकले आहे. श्वास घेणे कठीण झाले असून, प्रत्येक घरात एखादा तरी व्यक्ती आजाराने त्रस्त असल्याचे चित्र दिसत आहे.

शहरातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण श्वसनाचे आजार, दमा, त्वचारोग आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त झाले आहेत. मात्र, या भीषण परिस्थितीकडे नगरपरिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. “नजर आहे पण नजर नाही” अशी प्रशासनाची भूमिका दिसून येत आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाची निष्क्रियता तर धक्कादायक आहे. वारंवार तक्रारी, निवेदने, आंदोलने करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे. नियम फक्त कागदावरच राहिले असून, प्रत्यक्षात कारखानदारांना मोकळीक देण्यात आली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

राजकीय नेत्यांची भूमिकाही तितकीच संशयास्पद आहे. ठेके, आर्थिक व्यवहार आणि सत्तेचे गणित यात अडकलेल्या नेत्यांनी सामान्य नागरिकांच्या आरोग्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे. जनतेच्या जीवापेक्षा राजकीय स्वार्थ मोठा ठरत असल्याचे स्पष्ट दिसून येते.

घुग्घुस शहराला “प्रदूषण नंबर वन” अशी ओळख मिळत असताना, ही केवळ उपहासात्मक गोष्ट नसून एक गंभीर इशारा आहे. जर परिस्थिती अशीच राहिली, तर येत्या काळात हे शहर आरोग्याच्या दृष्टीने आणखी धोकादायक ठरू शकते.

याच पार्श्वभूमीवर “घुग्घुस बचाव – प्रदूषण हटाव” ही व्यापक मोहीम राबविण्यात येत असून, नागरिक आता संघटितपणे लढा उभारण्याच्या तयारीत आहेत. प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित कारखानदारांनी तात्काळ कठोर पावले उचलावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

घुग्घुसकरांचा संतप्त सवाल —
“आमच्या श्वासाचा गळा घोटणाऱ्यांना कोण थांबवणार?”

आता वेळ आहे निर्णयाची —
घुग्घुस वाचवणार, की त्याला प्रदूषणात गुदमरू देणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here