अध्यक्ष मॅडमला पाहिजे थंड एसी *नगरसेवक विवेक बोढे यांचा घणाघात
घुग्घुस नगर परिषदेत ” AC “वरून रणकंदन!
घुग्घुस, दि. १५
घुग्घुस नगर परिषदेच्या सभागृहात आज पार पडलेली चौथी सर्वसाधारण सभा वादाच्या भोवऱ्यात सापडली. नगराध्यक्षा दीप्ती सोनटक्के यांच्या कॅबिनमध्ये वातानुकूलित यंत्र (एसी) लावण्याच्या प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. शहरातील मूलभूत समस्या प्रलंबित असताना नगराध्यक्षांना स्वतःच्या आरामाची ओढ लागल्याची टीका करत भाजपा नगरसेवकांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला.
शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि नगराध्यक्षांना हवी एसी? – नगरसेवक विवेक बोढे
सभेच्या विषयसूचीमध्ये नगराध्यक्षांच्या कॅबिनसाठी एसी खरेदी करण्याचा ठराव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. यावरून भाजपा नगरसेवक विवेक बोढे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. माध्यमांशी बोलताना विवेक बोढे यांनी संताप व्यक्त केला की, शहरात सध्या पथदिवे बंद आहेत, नळांना थेंबथेंब पाणी येत असून नागरिक त्रस्त आहेत. नगर परिषदेच्या अनेक भागांत आरो मशिन बंद पडल्या आहेत, तर दुसरीकडे नगर परिषदेच्या कामगारांना वेळेवर पगार मिळत नाहीये. अशा परिस्थितीत शहराच्या विकासाचा विचार करण्याऐवजी नगराध्यक्षांना एसीची सुखसोय हवी आहे, हे दुर्दैवी आहे. ही ‘गरिबांची नगर परिषद’ राहिली नसून केवळ सत्ताधाऱ्यांच्या चैनीचे केंद्र बनल्याचा आरोपही त्यांनी केला.
सत्ताधाऱ्यांमध्येच फूट; आत्मदहनाचा इशारा
या सभेत केवळ विरोधकच नाही, तर सत्ताधारी गटातील मतभेदही चव्हाट्यावर आले. सत्ताधारी नगरसेवक तौफिक शेख यांनी बसस्थानकासमोरील देशी दारूचे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी सभेतच आत्मदहनाचा इशारा दिला. यावरून सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांमध्ये आपापसात समन्वय नसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले. तसेच, नगराध्यक्षांनी कार्यालयात भेटण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी २ अशी मर्यादित ठेवल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली.
या सभेला गटनेत्या मिना मोरपाका, स्वीकृत नगरसेवक निरीक्षण तांड्रा, नगरसेवक आशिष माशीरकर, गणेश पिंपळकर, नगरसेविका वैशाली ढवस आणि मधू तिवारी यांच्यासह अन्य सदस्यांची उपस्थिती होती. गदारोळातच एसीचा ठराव मंजूर करण्यात आला असला, तरी यावरून घुग्घुस शहरात आता राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.