भद्रावतीत थंड पेय एमआरपी पेक्षा जादा दराने विकणाऱ्या दुकानदारावर कारवाई
वैध मापन शास्त्र विभागाची धडक कारवाई
भद्रावती, दि. ०७ : चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान देशात उच्च स्थानी असल्याची नोंद झाली आहे. यामुळे लग्न कार्य, इतर कामासाठी बाहेर निघणाऱ्या नागरिक थंड पेय, लस्सी विकत घेतात. परंतु नफेखोर विक्रेते हे थंड पेय एमआरपी पेक्षा ५ ते १० रूपये जादा दराने विकत असल्याचे ग्राहकांकडून सांगितले जात आहे. असाच प्रताप भद्रावतीत घडला असून जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, चंद्रपूर चे सदस्य प्रवीण चिमुरकर यांच्या तक्रारीवरून चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील जाफरभाई टी स्टॉल अँड कोल्ड्रिंक्स या दुकानावर वैध मापन शास्त्र विभागाने धडक कारवाई केली. जाफरभाई टी स्टॉल अँड कोल्ड्रिंक्स सेंटर येथे तपासणी करतांना दिनशा मलाईदार लस्सी २०० एमएल ही ची एमआरपी २५/- असतांना ती ३०/- म्हणजे एमआरपी पेक्षा ५/- जादा दराने विकत असल्याचे समोर आले. त्यामुळे चंद्रपूर/गडचिरोली जिल्ह्याचे उपनियंत्रक, महादेव तोंडरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा विभागाचे निरीक्षक सुनिल वाडे यांच्या कडून कारवाई करण्यात आली असून सदर प्रकरण पुढील कारवाईसाठी वैध मापन शास्त्र विभाग, नागपूर येथे वर्ग करण्यात आले.
चौकट : एमआरपी पेक्षा जास्त दराने विक्री करने हा गुन्हा आहे. शीतपेय ही थंड करूनच विक्री करायला पाहिजे. जर कोणी एमआरपी पेक्षा जास्त दराने वस्तू विकत असल्यास तक्रार करावी. महादेव तोंडरे – उपनियंत्रक, वैध मापन शास्त्र विभाग, चंद्रपूर/गडचिरोली
————————————
शीतपेय विकत घेतांना दुकानदाराला समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु दुकानदार अरेरावकी करत नियम, कायद्याला विरोध करत होता आणि एमआरपी पेक्षा ५ ते १० रूपये जादा दराने विक्री करत असल्याने कारवाई करण्यात आली. – प्रवीण चिमुरकर, सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, चंद्रपूर