निर्माणाधीन उड्डाण पुलाचे काम तात्काळ पुर्ण करण्यासाठी ३ ऑगस्टला चक्का जाम
संतप्त महिलांची वेकोलि, रेल्वे व पोलिस ठाण्यात धडक
घुग्घुस: येथील राजीव रतन चौकात रेल्वे फाटकाजवळ निर्माणाधीन उड्डाणपुलाचे काम मागील ३ ते ४ वर्षांपासून संथगतीने सुरु आहे. या उड्डाणपुलाचे काम तत्काळ पुर्ण करण्यासाठी शुक्रवार, १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता रामनगर येथून संतप्त महिलांनी पायदळ मोर्चा काढला.
वेकोलिच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत उड्डाणपुलाचे काम तत्काळ पुर्ण करण्याची मागणी रेटून धरली तसेच रेल्वे अधिकारी व पोलिस ठाण्यात विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
याठिकाणी दररोज वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो काही दिवसापूर्वी रुग्णवाहिका वाहतुकीच्या कोंडीत अडकल्याने एका गर्भवती महिलेचा व बाळाचा मृत्यू झाला.
दररोज वारंवार रेल्वे फाटक बंद होत असल्याने एक ते दीड तास वाहतूक विस्कळीत होते. एक ते दीड तास थांबू राहावे लागते. रस्त्यावर खड्डे पडून पाणी साचून राहते त्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते.
त्यामुळे संतप्त महिलांनी मोर्चा काढला व ३ ऑगस्टला राजीव रतन चौकात चक्का जाम करण्याचा इशारा दिला.
यावेळी माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, सुरज कन्नुर, माला मेश्राम, अनिता कोल्हे, अल्का चुनारकर, शिला पडवेकर, शोभा निखाडे, चंदा जिवनकर व मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.