*शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरणी पत्रकार,राजकीय, शासकीय मान्यवरांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष निषेधातून निर्णायक भूमिकेकडे*

41

*शेतकरी अनुदान घोटाळा प्रकरणी पत्रकार,राजकीय, शासकीय मान्यवरांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष निषेधातून निर्णायक भूमिकेकडे*



*पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघात उद्भवलेल्या शेतकरी अनुदान घोटाळ्याविरोधात सुरू असलेल्या तीव्र असंतोषाच्या पार्श्वभूमीवर आता सर्वांचे लक्ष आज दि. १३ नोव्हेंबर गुरुवार रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणाऱ्या लाक्षणीक लक्षवेधी आंदोलनाकडे लागले आहे. मा. आमदार किशोरआप्पा पाटील, माजी आमदार तथा भाजपा नेते मा. दिलीपभाऊ वाघ, भाजपा नेते मा. अमोलभाऊ शिंदे, भाजपा नेत्या मा. सौ. वैशालीताई सुर्यवंशी, काँग्रेस नेते मा. सचिनदादा सोमवंशी तसेच उबाठा नेते मा. उध्दव मराठे व मा. रमेशशेठ बाफना या विविध राजकीय पक्षांच्या मान्यवरांनी तसेच पत्रकार बांधवांनी आतापर्यंत या प्रकरणी वेळोवेळी तीव्र निषेध नोंदविला आहे. मात्र आजच्या आंदोलनात हे मान्यवर नेमकी कोणती ठोस भूमिका घेतात, कोणती कृती जाहीर करतात आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी कसे उभे राहतात याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत आहे.*
आंदोलक संदीप महाजन यांनी स्पष्ट केले आहे की आता केवळ घोषणा व आश्वासनांनी शेतकऱ्यांचे दु:ख दूर होणार नाही, तर थेट पुर्ती आणि कारवाईची मागणी आहे. त्यासाठी दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते आमरण उपोषणास बसणार असल्याची घोषणाही महाजन यांनी केली आहे. शेतकरी हितासाठी ठेवलेल्या त्यांच्या ११ मागण्यांमध्ये 2025 ची अतिवृष्टी अनुदान जामनेर- चाळीसगाव प्रमाणे निकष लावून सरसकट खात्यात जमा करणे, २०१९ पासून आतापर्यंतच्या अनुदानाची सर्व माहिती पारदर्शकपणे प्रसिद्ध करणे, जालना, पाचोरा, मुक्ताईनगर येथे शेतकऱ्या अनुदान घोटाळे उघड झाले आहे त्यामुळे या प्रकरणाचे राज्यभर SIT/ED/CBI च्या तपासाची मागणी, पाचोरा येथील प्रथम तक्रारदाराच्या कबुलीनुसार तातडीने अटक, संशयित समितीऐवजी आर्थिक गुन्हा शाखेकडून स्वतंत्र तपास, न्यायालयीन प्रक्रियेपूर्वी आरोपींना पकडण्यासाठी स्वतंत्र पथक, सर्व पंचनामे व जबाब व्हिडिओ रेकॉर्डवर घेणे, लोकप्रतीनीच्या बनावट सह्या करणाऱ्यांची संपूर्ण नावे जाहीर करणे, ग्राम महसूल अधिकारी आशिष कडूबा काकडे व आरोपी गणेश हेमंत चव्हाण त्यांच्या नातेवाईकांना तातडीने अटक करणे व बोगस जमिनी व अवाजवी मालमत्ता खरेदीची चौकशी करून त्यांच्या मालमत्ता सरकार जमा करणे या मागण्यांचा समावेश आहे.
या सर्व मागण्यांच्या केंद्रस्थानी शेतकऱ्याच्या घामाचा आदर आणि भ्रष्टाचाराचा निर्णायक अंत हीच भूमिका आहे. त्यामुळे आज आंदोलनाच्या स्थळी येणारे राजकीय व शासकीय मान्यवर आपल्या भूमिकेचे स्पष्ट विधान प्रसार माध्यमांसमोर करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शेतकरी, पत्रकार बांधव आणि हितचिंतकांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करत आंदोलक संदीप महाजन यांनी सर्वांना आवाहन केले आहे –

“आता आश्वासन नको, तर पुर्ती हवी! शेतकरी हितासाठी सर्वांनी एकत्र यावे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here