Home Breaking News लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, घुग्घुस येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात...

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, घुग्घुस येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

33

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, घुग्घुस येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा



‘लॉयड्स आर्ट मेला’च्या विजेत्यांना पारितोषिके, आंतरराष्ट्रीय खेळाडू रोशन वाडगुरे यांचा विशेष सन्मान


 

घुग्घुस :
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, घुग्घुस येथे देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी अत्यंत देशभक्तीपूर्ण व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम कंपनीचे कार्यकारी संचालक मा. श्री. मधुर गुप्ता यांच्या हस्ते संपन्न झाला.
या प्रसंगी टॉगलहेडचे संचालक व सहसंस्थापक मा. श्री. क्रिश रामनानी, युनिट हेड श्री. वाय. जी. एस. प्रसाद, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. प्रशांत पुरी, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. मुकेश भेलावे, उपाध्यक्ष श्री. पवन मेश्राम यांच्यासह कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सुरक्षा पथकाच्या वतीने मान्यवरांना मानवंदना देण्यात आली. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा सन्मानचिन्ह व पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.
याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कल्पकता व पर्यावरणविषयक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘लॉयड्स आर्ट मेला’ चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
ही चित्रकला स्पर्धा २० जानेवारी २०२६ रोजी संपन्न झाली होती. या स्पर्धेत घुग्घुस, उसगाव, नकोडा, म्हातारदेवी, बेलसणी, मुरसा, शेणगाव, वढा, धानोरा व पिपंरी परिसरातील १७ जिल्हा परिषद शाळांमधील ७६४ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.
स्पर्धा विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार तीन गटांमध्ये घेण्यात आली होती.
इयत्ता १ ते २ – निसर्ग चित्र रंगविणे,
इयत्ता ३ ते ५ – माझी सुंदर शाळा,
इयत्ता ६ ते ८ – पाणी वाचवा – जीवन वाचवा
हे विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रांमधून निसर्गसंवर्धन, शालेय जीवन, पाणीटंचाई व जलसंवर्धन यांचे प्रभावी व आशयपूर्ण चित्रण सादर केले.
प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्हांसह सायकल, अभ्यास टेबल व खुर्ची देऊन गौरविण्यात आले. पारितोषिकांचे वितरण मा. श्री. मधुर गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.
याच कार्यक्रमात राष्ट्रीय पातळीवरील १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारे खेळाडू रोशन वाडगुरेयांचा विशेष सन्मान करण्यात आला. आगामी आशियाई स्पर्धेसाठी तयारी करण्यासाठी मा. श्री. मधुर गुप्ता व मा. श्री क्रिश रामनानी यांच्या हस्ते ५० हजार रुपयांचा धनादेश देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक महाप्रबंधक डॉ. विद्या पाल व श्री. महेश तिवारी यांनी केले, तर कुमारी सानिया देरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here