लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनतर्फे “एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन” विषयावर शेतकरी प्रशिक्षण
घुग्घुस : दिनांक ६ मार्च, गुरुवार रोजी लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या वतीने शेतकरी प्रशिक्षण केंद्र, मुरसा येथे “एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन” या विषयावर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमासाठी विषयतज्ञ म्हणून श्री. बोथीकर सर उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांना शेतीपिकांमधील प्रामुख्याने भाजीपाला या पिकात येणाऱ्या विविध रोग व किडींचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना त्यांनी पिकांवर येणाऱ्या विविध रोगांचे प्रकार, त्यांची ओळख, रोगांचा प्रादुर्भाव होण्याचा कालावधी, रोगांची लक्षणे तसेच त्यावरील योग्य नियंत्रण उपाययोजना याबद्दलची माहिती शेतकऱ्यांना दिली.
पिकांमध्ये आढळणाऱ्या विविध किडींचे प्रकार, किडींचा प्रादुर्भाव कधी व कसा होतो, त्याचे नियोजन कसे करावे, एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती, जैविक व रासायनिक उपाययोजना, तसेच योग्य प्रमाणात व योग्य वेळेत रासायनिक फवारणी कधी घ्यावी, एकात्मिक कीड व्यवस्थापन व एकात्मिक रोग व्यवस्थापन या पद्धती शेतीतील किडी व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाय मानले जातात. या पद्धतीमध्ये पिकांचे नियमित निरीक्षण करून किडी व रोगांचा प्रारंभिक टप्प्यात शोध घेणे, प्रतिकारक्षम वाणांची निवड, पीक फेरपालट, स्वच्छता राखणे, जैविक उपायांचा वापर तसेच आवश्यकतेनुसार मर्यादित प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणे या उपायांचा समावेश होतो. यामुळे किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो, उत्पादन खर्चात बचत होते आणि पिकांचे उत्पादन व गुणवत्ता वाढण्यास मदत होते. तसेच मातीची सुपीकता व पर्यावरणाचा समतोल राखून शेतकऱ्यांना अधिक सुरक्षित आणि शाश्वत शेती करण्यास मदत होते. याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले, या प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान टाळून उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक आणि शाश्वत पद्धतींची माहिती मिळाली.
प्रशिक्षणादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांवर येणाऱ्या विविध कीड व रोगांबाबतच्या प्रत्यक्ष अडचणी आणि समस्या प्रशिक्षक यांच्या समोर मांडल्या. पिकांमध्ये दिसणारी रोगांची लक्षणे, किडींचा वाढता प्रादुर्भाव तसेच त्यावरील योग्य नियंत्रण उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले. यावर विषयतज्ञांनी शेतकऱ्यांना योग्य व्यवस्थापन पद्धती, वेळेवर उपाययोजना, तसेच कीड व रोग नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या जैविक आणि रासायनिक उपायांबाबत मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे समाधान केले.
या कार्यक्रमाला लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या सहाय्यक महाप्रबंधक डॉ. विद्या पाल, तसेच शेतकरी प्रशिक्षण केंद्र, मुरसा येथील व्यवस्थापक डॉ.आदित्य कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या प्रशिक्षणांमधून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेती अधिक लाभदायक बनविण्याचे आवाहन डॉ. आदित्य कदम यांनी केले.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी धानोरा, पांढरकवडा, वढा, उसगाव, शेनगाव, नकोडा, मुरसा, म्हातारदेवी व बेलसणी या गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी प्रशिक्षण केंद्र, मुरसा येथील वरिष्ठ अधिकारी डॉ. महेंद्र वैरागडे, अधिकारी श्री. महेश उपरे, कनिष्ठ अधिकारी श्री. मानस मकासरे, यांनी केले तसेच विशेष सहकार्य सहाय्यक श्री. अभिजित चौधरी, श्री. आदित्य मोहितकर व श्री. धनंजय पिंपळशेंडे यांचे लाभले.
या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण, रोग व किड नियंत्रणाच्या आधुनिक पद्धती, तसेच शाश्वत शेतीसाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.