डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपुर्वी घुग्घुस शहरातील सर्व बंद हायमास्ट लाईट व पथदिवे सुरू करा: विवेक बोढे
घुग्घुस: शहरातील सर्व बंद असलेले हायमास्ट लाईट व पथदिवे १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपुर्वी तत्काळ सुरु करण्यात यावे अशी मागणी भाजपा नगर सेवक विवेक बोढे यांनी केली आहे.
घुग्घुस हे औद्योगिक शहर असून, लोकसंख्या ही ५० हजारांच्या जवळपास आहे. विविध जाती, पंथाचे विविध भाषिक आणि कामगार वर्ग मोठया प्रमाणात वास्तव्यास आहे.
शहरात एकूण ११ प्रभाग असून, अनेक प्रभागात व रस्त्यावरील हायमास्ट लाईट व पथदिवे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास ये-जा करतांना महिला व पुरुषांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
१४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येते. प्रभागातील व रस्त्यावरील हायमास्ट लाईट व पथदिवे बंद अवस्थेत असल्याने मिरवणुकीत सहभागी बांधवांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
ही समस्या लक्षात घेत नगर परिषदेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपुर्वी शहरातील बंद असलेले हायमास्ट लाईट व पथदिवे तत्काळ सुरु करण्यात यावे अशी मागणी नगर सेवक विवेक बोढे यांनी केली आहे.