Home Breaking News ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या मध्यस्थीने व्यावसायिकाला मिळाले ६०,००० रुपये

ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या मध्यस्थीने व्यावसायिकाला मिळाले ६०,००० रुपये

61

ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या मध्यस्थीने व्यावसायिकाला मिळाले ६०,००० रुपये



भद्रावती : शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक इस्तियाक अन्सारी यांना तब्बल एक वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेली ६० हजार रुपयांची रक्कम ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती शाखेच्या प्रभावी मध्यस्थीमुळे अवघ्या १५ दिवसांत परत मिळाली आहे. या यशस्वी कारवाईमुळे ग्राहक पंचायतच्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
इस्तियाक अन्सारी यांचे शहरात चारचाकी वाहनांच्या डेंटिंग-पेंटिंगचे वर्कशॉप आहे. त्यांच्या वर्कशॉपमध्ये एका वाहनधारकाने स्कॉर्पिओ वाहनाचे डेंटिंग-पेंटिंगचे काम करून घेतले होते. दि. १९ एप्रिल २०२५ रोजी वाहनाचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीने वाहन ताब्यात घेतले; मात्र ६८ हजार ५०० रुपयांचे बिल न भरता नंतर पैसे देण्याचे आश्वासन दिले. अनेकदा पाठपुरावा करूनही रक्कम न मिळाल्याने अन्सारी यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. संबंधित व्यक्तीने दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेला धनादेशही बाऊन्स झाला.
वारंवार प्रयत्न करूनही पैसे न मिळाल्याने अन्सारी यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती शाखेकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच ग्राहक पंचायतने तत्काळ कारवाई करत संबंधित वाहनमालकाशी संपर्क साधला. चेक बाऊन्स होणे हा गंभीर गुन्हा असून कायदेशीर कारवाई झाल्यास कारावास, दंड आणि व्याजासह रक्कम परत करावी लागू शकते, याची जाणीव करून देण्यात आली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने संपूर्ण रक्कम परत करण्याचे मान्य केले.
संबंधित व्यक्तीने थकीत ६० हजार रुपयांची रक्कम ग्राहक पंचायतच्या विशेष बैठकीत जमा केली. दि. ६ जून रोजी झालेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या राज्य व विदर्भ प्रांत कार्यकारिणीच्या विशेष बैठकीत ही रक्कम इस्तियाक अन्सारी यांना सुपूर्द करण्यात आली. उर्वरीत ८,५०० रुपये सात दिवसात अन्सारी यांना देण्याचे आश्वासन संबंधित व्यक्तीने दिले.
यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य सचिव अरूण वाघमारे, राज्य संघटक सर्जेराव जाधव, राज्य कार्यकारी सदस्य चंद्रकांत डागा, विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, विदर्भ प्रांत सचिव लिलाधर लोहरे, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, भद्रावती शाखेचे अध्यक्ष प्रवीण चिमुरकर, सचिव वतन लोणे, उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार, सहसचिव करूणा मोघे, कोषाध्यक्ष भारत खोब्रागडे, संघटक सोनल वावरे तसेच सदस्य विनोद ठमके, गुरुदेव बावणे, रवी भांडारकर, नामदेव रामटेके आणि प्रतिक्षा बनकर उपस्थित होते. ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या मध्यस्थीमुळे दीर्घकाळ अडकून पडलेली रक्कम अल्पावधीत परत मिळाल्याने इस्तियाक अन्सारी यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here