Home Breaking News लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनच्या भव्य रक्तदान शिबिरात ५०५ रक्तदात्यांचा विक्रमी सहभाग

लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनच्या भव्य रक्तदान शिबिरात ५०५ रक्तदात्यांचा विक्रमी सहभाग

49

लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनच्या भव्य रक्तदान शिबिरात ५०५ रक्तदात्यांचा विक्रमी सहभाग



जिल्ह्यात प्रथमच नवा इतिहास


घुग्घुस : सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये एकूण ५०५ रक्तदात्यांनी रक्तदान करून जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तसंकलनाचा विक्रम प्रस्थापित केला. या ऐतिहासिक उपक्रमामुळे जिल्ह्यात रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण होण्यास मोठी मदत झाली असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मा. श्री. YGS प्रसाद, युनिट हेड, लॉयड्स मेटल्स, घुग्घुस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. प्रशांत पुरी, उपाध्यक्ष श्री. सुशांतो कुमार मिश्रा, उपाध्यक्ष श्री. राजेश कुमार, वरिष्ठ महाप्रबंधक डॉ. कौशिक घोष, महाप्रबंधक श्री. विकास वर्मा, सहायक महाप्रबंधक डॉ. विद्या पाल तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी व रक्तसंकलन पथक प्रमुख उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना, “रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते,” असे सांगत नागरिकांना नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले. समाजातील प्रत्येक निरोगी नागरिकाने वर्षातून किमान एकदा तरी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असेही त्यांनी नमूद केले.
शिबिरादरम्यान युवक, युवती, महिला, पुरुष, कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. रक्तदात्यांसाठी नोंदणी, वैद्यकीय सल्ला, रक्तसंकलन तसेच अल्पोपहाराची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण रक्तदान प्रक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या अनुभवी वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली सुरक्षितरित्या पार पडली.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा गौरव म्हणून लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनतर्फे आकर्षक ऑफिस बॅग व टी-शर्ट भेटस्वरूप प्रदान करण्यात आले. या उपक्रमामुळे रक्तदात्यांचा उत्साह अधिक वाढला असून भविष्यातही रक्तदानासाठी पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळाली.
या यशस्वी रक्तदान शिबिराबद्दल जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या रक्तसंकलन अधिकारी स्वाती देरकर यांनी लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून विशेष गौरव केला. जिल्ह्यात विक्रमी रक्तसंकलन घडवून आणल्याबद्दल तसेच समाजात रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी फाऊंडेशनने केलेल्या उल्लेखनीय कार्याची त्यांनी प्रशंसा केली.
यावेळी रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनतर्फे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी व संपूर्ण रक्तसंकलन पथकाचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू प्रदान करून त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करण्यात आला. रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य सहकार्याबद्दल फाऊंडेशनच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
हा विक्रमी रक्तदान उपक्रम यशस्वी करण्यासाठी लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनचे अधिकारी, कर्मचारी, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीचे वैद्यकीय पथक, स्वयंसेवक तसेच सर्व रक्तदाते यांनी मोलाचे सहकार्य केले. जिल्ह्यात प्रथमच ५०५ रक्तदात्यांचा सहभाग नोंदवत या शिबिराने रक्तदान क्षेत्रात नवा इतिहास घडविला असून, सामाजिक बांधिलकी जपत भविष्यातही अशा समाजोपयोगी व लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प लॉयड्स इन्फिनाइट फाऊंडेशनने व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here