महसूल अधिकाऱ्यांवर थेट हल्ला, रस्ता अडवून जीवे मारण्याची धमकी – घुग्घुस पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल
रेती चोरट्यांची गुंडगिरी उघड, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न; प्रशासनाचा कडक इशारा
घुग्घुस (जि. चंद्रपूर) | 30 डिसेंबर 2025
अवैध वाळू वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या शासकीय कारवाईदरम्यान सत्ताधारी नेत्यांच्या वरदहस्तामुळे बळावलेल्या वाळू माफियांनी थेट महसूल व शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेला खुले आव्हान देण्यात आले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घुग्घुस- : दि. 29/12/2025 रोजी रात्री 11.35 ते 11.55 वाजण्याच्या सुमारास, घुग्घुस–नकोडा रोडवरील व्हाईट हाऊस परिसरात, अवैध वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर–ट्रॉली जप्त करून पोलीस ठाण्याकडे नेत असताना ट्रॅक्टर मालक ईम्रान खान व त्याच्या सहकाऱ्यांनी आपले महिंद्रा XUV 500 (MH-34-BR-0138) हे वाहन रस्त्यावर आडवे लावून शासकीय पथकाचा रस्ता अडविला.
आरोपींनी ट्रॅक्टरची चावी जबरदस्तीने काढून घेत वाहनचालकांना खाली उतरवले. यावेळी कर्तव्यावर असलेले तलाठी नवनाथ गोविंदराव यांना धक्काबुक्की करून त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
“माझ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली तर तुम्हाला पाहून घेतो” अशी उघड धमकी देत शासकीय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच तातडीने डायल 112 वर संपर्क साधण्यात आला. काही वेळातच घुग्घुस पोलीस घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली.
या प्रकरणी घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 303(2), 132, 126(2), 296, 351(2) व 3(5) प्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस प्रफुल विलासराव डाहुले (घुग्घुस पोलीस ठाणे) करत आहेत.
प्रशासनाचा ठाम इशारा
अवैध वाळू माफियांची दादागिरी, शासकीय कर्मचाऱ्यांवरील हल्ले आणि कायद्याला आव्हान देणाऱ्या कृत्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही.
शासकीय कामात अडथळा आणणारे, धमकी देणारे व हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा ठाम इशारा प्रशासनाने दिला आहे.